प्रदूषण विरोधात खारघर मध्ये मोर्चा
मोर्चात रोडपाली, कळंबोली, खारघर मधील नागरिक सहभागी
खारघर : तळोजा एमआयडीसी मधील कारखान्यांमधून हवेत सोडण्यात येणाऱ्या प्रदषित वायू मुळे आणि परिसरातील नदी, नाले प्रदूषित झाल्यामुळे ‘रोडपाली रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन'चे अध्यक्ष गिरीश जोशी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक सिंग यांच्या नेतृत्वाखाली खारघर सेंट्रल पार्क ते हिरानंदानी दरम्यान १७ डिसेंबर रोजी शांतता मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात रोडपाली, कळंबोली आणि खारघर मधील लहान मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक आणि महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चात लहान बालकांच्या हाती असलेले, ‘प्रदूषित नही शुध्द हवा चाहिये, वातावरण को प्रदूषित करणे वाले को जनता माफ नही करेगी, जन जन का एकही सपना-प्रदूषण मुक्त खारघर अपना, शुध्द हवा की जरुरत है-क्योंकी जीवन बहुत खूबसुरत है, प्रदूषण थांबवा, अगर चाहते हो लंबी आयु तो स्वच्छ रखो जल और वायू, प्रदूषित नही हमे शुध्द हवा चाहिये, या घोषणांचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यापुढे एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात सर्वांना एकत्र करुन पुढच्या पिढीला वाचविण्यासाठी प्रदूषण विरोधात लढा देण्यासाठी सर्वानी एकजुटीने लढा देण्याचा संकल्प मोर्चात उपस्थित नागरिकांनी केला. विशेष म्हणजे या मोर्चात रोडपाली येथील आम्रांते, रीजेंसी एलांझा, ट्यूलिप आदी सोसायटीसह दीडशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार १५ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले-मुली मोठ्या प्रमाणात प्रदुषणाच्या विळख्यात दिवसागणिक अडकत चालली आहेत. येणाऱ्या पिढीचे भविष्य सुध्दा प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. तसेच र्गभवित महिलांच्या आरोग्यावर आणि तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या निष्पाप बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, खारघर, कळंबोली, तळोजा, कामोठे, रोडपाली आदी परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाच्या विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले.
रात्री हवेत सोडला जाणाऱ्या दुर्गंधीयुक्त रासायनिक वासामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधून घ्ोत आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरु राहणार आहे. - दीपक कस्तुरी, सामाजिक कार्यकर्ता.