जेएनपीए सेझमध्ये भुखंडासाठी ४० टक्के रवकमेपेक्षा अधिक बोली
सेझ प्रकल्पात निर्माण होणाऱ्या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार
उरण : देशातील सर्वात मोठ्या २७७ हेक्टर क्षेत्रावरील ‘जेएनपीए सेझ'च्या ५६५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर ई-निविदा आणि लिलावाव्दारे यशस्वी ठरलेल्या निविदाकारांना १४ भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे.भाडेपट्ट्याने दिल्या जाणाऱ्या या भुखंडासाठी राखीव किमतीपेक्षा ४० टक्के जास्त रवकम बोली देण्यात आली आहे, अशी माहिती ‘जेएनपीए'चे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.
जेएनपीए बंदर आधारित ऑपरेशन मल्टी-प्रॉडक्ट असलेला देशातील सर्वात मोठा स्पेशल इकॉनॉमिक झोन (जेएनपीए सेझ) तयार करण्यात येत आहे. जेएनपीए सेझच्या धोरणात्मक जमीन वाटप आणि औद्योगिक विकास याबाबत माहिती देण्यासाठी जेएनपीए मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘जेएनपीए'चे अध्यक्ष संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत ‘जेएनपीए'चे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, ‘जेएनपीए सेझ'चे वरिष्ठ अधिकारी नितीन बोरवणकर, वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग आदी उपस्थित होते.
जेएनपीए मालकीच्या २७७ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या सेझमध्ये ५६५ कोटींच्या गुंतवणुकीनंतर अत्यावश्यक पायाभूत सोयीसुविधांचा विकास पूर्ण झाला आहे. आत्तापर्यत ३१ युनिटसना सेझ भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये नऊ युनिट आणि एक फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन (एफटीडब्ल्यूझेड) आधीच कार्यरत आहे. सेझ जमिनीच्या ६० वर्षांच्या भाडेपट्ट्यासाठी पारदर्शक ई-निविदा कम ई-लिलाव प्रक्रिया गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. भाडेपट्ट्यावरील १६३ हेक्टर जमिनींपैकी ६२ हेक्टर जमीन याआधीच ३१ युनिट्सना देण्यात आली आहे. तर ११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावात २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली. विशेष म्हणजे राखीव किंमतीपेक्षा वरच्या प्लॉट्सच्या बोलीमध्ये एकूण १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इनव्हेस्टमेंट फॉर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने सेझमधील एक एकर जमीनसाठी तीन कोटींचा दर निश्चित केला आहे.मात्र त्यानंतरही काही भूखंडांसाठी राखीव किंमतीपेक्षा ४० टक्के पेक्षा जास्त बोली प्राप्त झाली आहे, अशी माहिती ‘जेएनपीए'चे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.
ई-लिलावानंतर ‘जेएनपीए'ने १४ यशस्वी बोलीदारांना १४ भूखंडांच्या वाटपासाठी लेटर्स ऑफ इंटेंट जारी केले आहेत.त्यासाठी ११० कोटींहून अधिक प्रिमियमची रक्कम जमा झाली आहे. यामध्ये देशातील वेलस्पन वन आणि फाइन ऑरगॅनिक्स सारख्या आघाडीच्या उद्योगांचा समावेश आहे. येत्या दोन वर्षांत सेझ प्रकल्पात निर्माण होणाऱ्या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे ‘जेएनपीए'चे अध्यक्ष संजय सेठी यांनी नमूद केले.