नवी मुंबई महापालिका तर्फे ‘स्वच्छ शौचालय अभियान'

तपासणीसाठी महिला बचत गटांची नियुक्ती

नवी मुंबई : स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेली नवी मुंबई महापालिका केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्वच अभियानांमध्ये पुढाकार घ्ोऊन काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार द्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ शौचालय अभियान' कार्यक्रमातही नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका उत्साहाने सहभागी झालेली आहे.

१९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिवसापासून ‘स्वच्छ शौचालय अभियान'ला प्रारंभ झाला असून, २५ डिसेंबर २०२३ या सुशासन दिनापर्यंत अभियान सुरु राहणार आहे. या कालावधीत सर्व शौचालयांमध्ये विशेष ‘स्वच्छता आणि देखभाल' मोहीम राबवली जाणार असून, शौचालयांमध्ये ‘कार्यान्वित, प्रवेशयोग्य, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित' अशा बाबींनुसार शौचालय तपासणी करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत महिला बचत गटांद्वारे शौचालयांची तपासणी करण्यात येणार असून, त्यांची वर्गवारी केली जाणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरणही केले जात आहे. यासाठी महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना रितसर प्रशिक्षण दिले गेले आहे. महिला बचत गट सदस्यांचे तपासणी समूह शौचालयांना भेटी देऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत दिलेल्या निकषानुसार त्यांचे मूल्यांकन करुन शौचालयांना श्रेणी देणार आहेत.

दरम्यान, महापालिका तर्फे ‘स्वच्छ शौचालय चॅलेंज' जाहीर करण्यात आले असून, या अभियानाचा शुभारंभ ५ डिसेंबर रोजी झाला आहे. ‘स्वच्छ शौचालय चॅलेंज' अभियान १५ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. या अंतर्गत स्वच्छ शौचालयांना ‘स्वच्छ भारत सार्वजनिक शौचालय' असा गुणवत्तेचा दर्जात्मक शिक्का प्राप्त होणार आहे.

‘स्वच्छ शौचालय अभियान'च्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका उपायुवत (घनकचरा व्यवस्थापन विभाग) तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे महापालिका नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी अलिकडेच विविध शौचालयांना भेटी देत तेथील केअरटेकरना अधिक गुणात्मक काम करण्याच्या सूचना देऊन शौचालयातील स्वच्छतेची आणि सुविधांची पाहणी केली.

स्वच्छता विषयक नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी नवी मुंबई महापालिका ‘स्वच्छ शौचालय अभियान'च्या अनुषंगाने तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय, माहिती शिक्षण आणि प्रसारासाठी वॉल स्ट्रक्चर उभारणी, स्वच्छतागृहातील वर्तनाविषयी जागरुकता, प्रभागातील शौचालयांच्या स्थितीविषयी चर्चा तसेच शौचालयांची देखभाल करणाऱ्या केअरटेकरला ‘बेस्ट केअर टेकर' पुरस्कार देऊन गौरविणे, असे नानाविध उपक्रम राबविणार आहे.

नवी मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि नवी मुंबई शहराला विविध कारणांमुळे भेटी देणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाची शौचालये उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिका कटिबध्द असून, महापालिकेची सर्व शौचालय ‘गुगल मॅप'वर सहजपणे उपलब्ध आहेत. नागरिकांच्या वापरासाठी सार्वजनिक शौचालयांचा गुणात्मक दर्जा कायम राहण्याकडेही लक्ष दिले जात आहे. - डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुवत (घनकचरा व्यवस्थापन विभाग) - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इंडोको रेमेडिज कामगारांना ९६६५ रुपये पगारवाढ