ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्प आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग
‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमात नागरिकांना त्यांची शहराबद्दलची मते मांडण्याची संधी
ठाणे : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, याकरिता अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाची आखणी केली आहे.
आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरु झाली आहे. त्यात, आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जात आहे. तसेच, ठाणे शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. त्यात, प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करुन ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून, प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्याच सोबत, नागरिकांची मतेही जाणून घेण्याचीही गरज असते. त्यामुळे ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या चर्चेच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला आणि बाल कल्याण या विभागांसाठी कार्यक्रमाची आखणी करताना त्यात काम करणाऱ्या, अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोलाचा ठरु शकतो. तसेच, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांचे प्रश्न लक्षात घेवून त्यांचे प्राधान्यक्रम ठरविणे शक्य होते. त्यामुळे चर्चा नेहमीच उपयोगी ठरतात. म्हणूनच, नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या तीन महिन्यांमध्ये विविध गटांच्या माध्यमातून आयुक्त नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यात, डॉक्टर्स, वकील, सीए, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, उद्योजक संघटना आदींच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ठाणे शहरातील झोपडपट्टी क्षेत्रात राहणारी मोठी लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशीही संवाद होणार आहे. स्वतःच्या क्षेत्रात नेमके काय आवश्यक आहे याची जशी जाण या मंडळींना आहे, तसेच शहरात वावरताना, नागरिक म्हणून त्यांना काही सूचना, उपाय, बदल या चर्चेत सुचविता येतील. शहराच्या जडणघडणीत त्यांना महापालिकेच्या माध्यमातून सहभागी होता येईल, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
आपल्या शहराच्या जडणघडणीत आपलेही योगदान असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यात, ठाणेकरांना शहराविषयी असलेल्या अभिमानाची प्रचिती यापूर्वीही आलेली आहे. आता ठाणे शहर मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने नागरिक म्हणून आपली जबाबदारीही वाढली आहे. आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, रस्ते, परिवहन सेवा, याबद्दल नागरिक वेळोवेळी मते मांडतात, तक्रारी करतात. तसेच, सुधारणा दिसू लागली की कौतुकही करतात. कचरा टाकण्याची पारंपरिक ठिकाणे आता स्वच्छ राहू लागली आहेत. दिवसातून दोन वेळा रस्त्यांची सफाई होऊ लागली आहे. याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद येतो आहे. या पार्श्वभूमीवर, ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमातून ठोस मुद्दे समोर येऊ शकतील. त्यातून चर्चा होऊन महापालिकेच्या कारभारात नागरिकांचा सहभाग वाढीस लागेल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.
‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या चर्चेच्या माध्यमातून नागरिकांकडून जे मुद्दे समोर येतील त्यांचा अंतर्भाव ठाणे महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात केला जाणार आहे. तसेच, काही बाबींची उकल राज्य शासनाच्या माध्यमातून होणे आवश्यक असेल तर तसा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. - अभिजीत बांगर, आयुक्त - ठाणे महापालिका.