मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
इंडियन ऑईल अदानी व्हेंचर प्रकल्पा विरोधात धुतूम ग्रामपंचायतीचे आमरण उपोषण सुरू
ग्रामपंचायत सदस्य व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे दि. २० पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात
उरण - धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी ( दि २०) पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणाला धुतूम गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देवून पाठिंबा दिला आहे.
धुतूम गावाच्या हाकेच्या अंतरावर ज्वलनशील पदार्थ साठवू ठेवणारी इंडियन आँईल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.हा प्रकल्प १९९७ साली उभारण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या उभारणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमीनी संपादन करुन सिडकोला दिल्या आहेत.मात्र मागील १८ वर्षांपूर्वी सदर कंपनीत ३ कायमस्वरूपी कामगार व २४ कंत्राटी कामगार म्हणून धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सामावून घेतले.त्यानंतर सदर प्रकल्पात बाहेरील १०० कामगारांची भरती करुन धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे या प्रकल्पात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना व गावातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या आपल्या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोमवारी ( दि२०) उपोषण सुरू करण्यात आले आहे.जवळ जवळ संपुर्ण धुतूम गावातील सर्वपक्षीय मंडळी या आंदोलनात सहभागी झाली आहे. धुतूम ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे अदानी व्हेंचर्स प्रकल्पा च्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात खाजगी बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, उपसरपंच कविता कुंदन पाटील, ग्रामपंचायत सदस्या स्मिता नंदकुमार ठाकूर,सुचिता राजन कडू,अनिता सुजित ठाकूर,करिश्मा रुपेश ठाकूर, रविनाथ बाळाराम ठाकूर, प्रकाश काशिनाथ ठाकूर, चंद्रकांत कमळाकर ठाकूर, प्रेमनाथ अनंत ठाकूर यांच्या सह प्रकल्प बाधित ८३ शेतकरी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रकल्पातील अधिकारी वर्गाने धुतूम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आपल्या प्रकल्पात कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तेव्हाच आमरण उपोषण सोडणार असल्याचा निर्धार धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुचिता प्रेमनाथ ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य,प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.