दिवाळी संपली तरी ‘आनंदाचा शिधा'ची प्रतिक्षा

पनवेल विभागात केवळ ३८% ग्राहकांना शिधा वाटप

नवीन पनवेल : दिवाळी संपली तरी देखील पनवेल तालुक्यातील लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा' वाटप झालेला नाही. अन्न-नागरी पुरवठा विभागातर्फे १९९ दुकानांमध्ये ‘आनंदाचा शिधा' वाटप करण्यात आला. मात्र, रेशनिंग दुकानदार शिधावाटप करण्यात उदासीन ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार? ते पाहणे गरजेचे आहे.

पनवेल तालुक्यात १९९ रास्त भाव धान्य दुकाने आहेत. शासनाने दिवाळीत ‘आनंदाचा शिधा' देण्याचे जाहीर केले. मात्र, आजही पनवेल मधील काही गावांमध्ये ‘आनंदाचा शिधा'चे वाटप झालेले नाही. रेशनिंग दुकानदारांकडून ‘आनंदाचा शिधा'चे वाटप झालेले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत पुरवठा विभागाचे प्रदीप कांबळे यांना विचारले असता १९९ दुकानांमध्ये ‘आनंदाचा शिधा' पोहोच केला असल्याचे सांगितले. मात्र, ऑनलाईनला केवळ ३८ टक्के नागरिकांना शिधा वाटप झाले असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. एकूण ७४,६९० किट आले होते, त्यापैकी २५,१२६ किट वाटप झाले आहेत. त्यामुळे उर्वरित किट कधी वाटप होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयात नागरिकांना ‘आनंदाचा शिधा' देणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी माल पोहोचवला. यात साखर एक किलो, तेल एक लिटर, पोहा अर्धा किलो, रवा अर्धा किलो, मैदा अर्धा किलो, चणाडाळ अर्धा किलो अशा सहा वस्तुंचा समावेश आहे. १० नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात झाली, भाऊबीज झाली की दिवाळी संपली असे म्हटले जाते. त्यामुळे १८ नोव्हेंबर उजाडला तरी देखील ५० टक्के नागरिकांना शिधावाटप झाले नाही. केवळ ३८ टक्के नागरिकांना
‘आनंदाचा शिधा' वाटप झाला आहे. दिवाळीच्या सणाच्या दिवशी ‘आनंदाचा शिधा' वाटप झालेले नसल्याने आता दिवाळी झाल्यानंतर या शिधा वाटपाचे काय करायचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे दिवाळीत नागरिकांना आनंदाचा शिधा‘आनंदाचा शिधा' न देणाऱ्या रेशनिंग दुकानदारांवर काय कारवाई करणार? ते येत्या काही दिवसात कळणार आहे.

यासंदर्भात प्रत्येक दुकानाची माहिती घेणार असून यानंतर ॲक्शन घेणार आहे. - प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी-पनवेल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फराळ वाटप