हवा गुणवत्ता मानकाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई
नवी मुंबई महापालिका करणार ‘हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडा'साठी जनजागृती
नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील हवा गुणवत्तेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेने तत्पर कार्यवाही करण्यास सुरुवात केली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेत डेब्रीज नियंत्रणासाठी भरारी पथके २४ तास अधिक कृतीशील करण्याचे तसेच बांधकाम साईटस् वर विशेष लक्ष देत त्याठिकाणीही आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची खात्री करुन घेण्यासाठी विभागनिहाय विशेष पथके त्वरित स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबई महापालिकेने हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडा तयार केला असून नवी मुंबई महापालिकेनेही देखील हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडा अंगीकृत करीत असल्याचे सांगत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचेही निर्देश दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी प्रत्यक्ष तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, सहा.संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण आणि आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
दिवाळी सणात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जातात. त्यामुळे हवा प्रदुषणात भर पडते. सदर बाब लक्षात घेत इकोफ्रेन्डली फटाक्यांचा वापर करावा. तसेच उच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे रात्री ७ ते १० याच वेळेत फटाके वाजवावेत. या नियमाचे उल्लंघन होणार नाही याकडे पोलिसांप्रमाणेच विभाग अधिकारी यांनीही विशेष लक्ष द्यावे. शहराचे पर्यावरण आणि हवा गुणवत्ता चांगली रहावी अशी आपल्या सर्वांचीच प्राधान्याने जबाबदारी असून त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना गांभीयाने कराव्यात. उच्च न्यायालयाने विभाग अधिकाऱ्यांवर याबाबतची जबाबदारी निश्चित केली असून क्षेत्रीय स्तरावर सतर्क राहण्याचे आयुक्तांनी निर्देर्शित केले. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्तेच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुकत राजेश नार्वेकर यांनी दिला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७ ठिकाणी हवा गुणवत्ता मापन केंद्रे कार्यान्वित असून याठिकाणच्या रिडींगचे दर दोन तासांनी निरीक्षण करुन त्यामध्ये आढळणाऱ्या रिडींगप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. बांधकाम साईटस् तपासण्यासाठी नगररचना आणि अभियांत्रिकी विभागातील अभियंत्यांची विशेष पथके विभागनिहाय गठीत करण्यात आली असून त्यांनी दररोज केलेल्या कार्यवाहीचा तपशील वेबपेजवर नियमीत अपलोड करावयाचा आहे, असे निर्देश आयुवतांकडून देण्यात आले. या कालावधीत बांधकाम साईटस् वरील डेब्रीज वाहतूक पूर्णपणे बंद राहील असे निर्देशीत करीत डेब्रीज विरोधी पथके अधिक कृतीशील करावीत. वाशी आणि ऐरोली या दोन्ही टोलनाक्यांवर काटेकोर लक्ष ठेवावे. बांधकाम साहित्याची वाहतूक करावयाची झाल्यास ते वाहन पूर्णतः झाकलेले असावे, अशाही आयुक्तांमार्फत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
यासोबतच रस्ते, दुभाजक या ठिकाणीही स्प्रिंकलरद्वारे सफाई करुन धुळीचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. तसेच १०० हून अधिक चौकांमध्ये बसविलेली कारंजी कार्यान्वित करुन वाहतुकीच्या वर्दळीमुळे होणारे धुळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले.
दरम्यान, नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता स्थिती चांगली रहावी याकरिता नागरिकांचेही सहकार्य अतिशय मोलाचे असून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामार्फत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देतानाच नवी मुंबई क्षेत्रात ठिकठिकाणी मायकींग द्वारे तसेच पोस्टर्स आणि सोशल मिडीया द्वारे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी तत्पर कार्यवाही करावी, असेही आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई शहराची ओळख स्वच्छ शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर अशीही असून ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये मानांकित असलेल्या आपल्या शहराची ओळख हवा गुणवत्तेतही उत्तम असावी. याकरिता संबंधित प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी पार पाडावी. सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी याकामी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.