सानपाडा येथील अर्धवट पादचारी पुलाच्या कामाला अखेर मंजुरी
सोमनाथ वास्कर यांच्या इशाऱ्याची शासनाकडून दखल
तुर्भे : सानपाडा गांवच्या पूर्वेला सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणामुळे अर्धवट ठेवण्यात आलेल्या तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोरील पादचारी पुलाच्या कामाला ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'ने मंजुरी दिली आहे.
सायन-पनवेल महामार्गावर सन २०१०च्या सुमारास सानपाडा आणि तुर्भे एमआयडीसी दोन विभागांना जोडणारा पादचारी पूल उभारण्यात आला. या पुलाच्या बांधकामास अंदाजे २५ लाखांहून अधिकचा खर्च करण्यात आला होता. या पुलामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या सायन-पनवेल महामार्गावर रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. तसेच रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांवरही नियंत्रण मिळवता येईल, असा दावा ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'ने केला होता.
मात्र, लाखो रुपये खर्च करुनही सदर पूल अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्याने महामार्ग ओलांडताना नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. याबाबत स्थानिक माजी नगरसेवक तथा ‘शिवसेना'चे महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर यांच्याकडून वारंवार ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'कडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जात होता. तुर्भे आणि सानपाडा एमआयडीसी विभागात कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग आणि सानपाडा मधील रहीवासी वर्ग याच महामार्गावरुन जीव मुठीत घेऊन कायम प्रवास करीत होते.
याबाबत सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी मुंबई महापालिका आणि महारेल व्यवस्थापन यांच्या निदर्शनास आणून देखील संबंधित प्रशासन कानाडोळा करीत असल्याने जोपर्यंत अर्धवट पादचारी पुलाच्या कामास शासन मंजुरी देत नाही तो पर्यंत सदर महामार्गावर नव्याने उभारलेला उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुले करु नये अन्यथा महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमनाथ वास्कर यांनी संबंधितांना प्रत्यक्ष भेटून दिला होता. अखेर शासनाकडून सोमनाथ वास्कर यांच्या मागणीची दखल घेण्यात आल्याने अर्धवट अवस्थेतील सदर पादचारी पुलाचे ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'मार्फत कार्यादेश काढून पुलाचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सानपाडा येथील पादचारी पुलाच्या कामास सुरुवात होऊन सायन-पनवेल महामार्गावर पादचारी पुल पूर्णत्वास येणार आहे.
अर्धवट पुलाच्या रखडलेल्या कामामुळे रस्ता ओलांडताना अपघाताच्या अनेक घटना घडल्या होत्या. रस्ता ओलांडणे म्हणजे साक्षात मृत्युलाच आमंत्रण देण्यासारखे होते. अर्धवट पुलाचे काम पूर्णत्वास यावे यासाठी संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर संबंधित प्रशासनाने मागणीची नोंद घेत अखेर कामाचा कार्यादेश काढला आहे. - सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक- सानपाडा.