कवितेने बहरलेला सोनचाफा  कवी वसंत सावंत

वसंत सावंत सरांच्या कवितेचे मराठी साहित्यात काय स्थान आहे ? तर त्या कवितेतील अस्सलपणा. साठोत्तरी कवितेत सरांच्या बरोबरीने अनेक सामजिक कवी लिहित होते, त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण होत असताना सरांनी आपल्या सौंदर्यलक्षी पिंडाशी प्रतारणा न करता आपल्या स्वभावधर्माची कविता लिहिली, त्यातून त्यांनी प्रादेशिक बोली, लोकसंस्कृती, ग्रामसंस्कृती, बैल, नांगरट सारख्या कवितेतून ”कृषीसंस्कृती”अधोरेखीत केली. त्यांच्यासारखी अस्सल निसर्गकविता नंतरच्या काळात क्वचितच कोणाला लिहायला जमली.

२३ डिसेंबर हा दिवस आला की मला त्या दिवसाच्या अनेक आठवणी दडून येतात. २८ वर्षांपूर्वी झालेल्या ह्या दुर्दैवी घटना. अगदी कालपरवा घडून गेल्यासारख्या वाटतात. २३ डिसेंबर १९९६ ला दादर वरून विक्रोळीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी ब्रिजवरून जात असताना विजय तापस सर भेटले आणि त्यांनी जी बातमी दिली ती अपेक्षित होती; पण तेवढीच दुर्दैवी. तापस सर म्हणाले "अरे, कवी वसंत सावंत गेले... मराठी कवितेतील एक सशक्त कवी गेला.”

वसंत सावंतांना त्यांचे समकालीन एकतर वसंत किंवा सावंत, मधु मंगेश कर्णिकासारखे सुहृदय त्यांना पटेल देखील म्हणायचे. पण त्यानंतरच्या पिढीतील बहुतेकजण सावंतांना सावंत सर म्हणायचे. त्यातील बहुतेकांचे ते सावंतवाडीच्या एस पी के कॉलेजमधील प्राध्यापक होते. तर बहुतेकांना कविता करायला किंवा काही लिहायला सरांनी भाग पाडल होतं.

   सरांनी २५ डिसेंबर १९७२ रोजी स्थापन केलेल्या तत्कालीन दक्षिण रत्नागिरी साहित्य संघाच्या "कोजागिरी संमेलनात”  सिंधुदुर्गातील बहुतेक कवी काव्यवाचनाची पहिली पायरी चढले. माझी आणि सावंत सरांची पुस्तकी ओळख प्रथम झाली ती मी दहावीत असताना. त्यावेळी सावंत सरांची "सुतारपक्षी” ही कविता पाठ्यपुस्तकात होती. त्याच दरम्यान शाळेबाहेरच्या कुठल्यातरी निबंध स्पर्धेत मला बक्षीस म्हणून सावंत सरांचा "माझ्या दरातील सोनचाफ्याचे झाड” हा संग्रह बक्षिसादाखल मिळाला. मी दहावीत असताना मराठी शिकवायला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तावडे सर होते. त्यांची आणि सावंत सरांची ओळख होती. त्यातूनच सरांचे संग्रह त्यांनी भेटीदाखल आम्हाला दिले होते.

    अकरावीत असताना म्हणजे साधारण १९९५ साली मी भांडुपच्या मेनन कॉलेजमध्ये शिकायला होतो, तेव्हा कुठल्यातरी निम्मिताने सावंत सरांना भेटायची संधी मिळाली. मी आणि माझा मित्र असे आम्ही दोघे सरांना भेटायला गेलो होतो, सर तेव्हा सावंतवाडीच्या एस पी के कॉलेजमधून निवृत्त होऊन भांडुपला कायमस्वरूपी राहायला आले होते. "अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग रक्तास दे चेतना” असे कोकणगर्वगीत लिहिणाऱ्या कवीला भेटायची ती पहिली वेळ, सरांना नव्हे तर कुठल्यातरी कवी लेखकाला भेटायची ती पहिलीच वेळ, याआधी ज्यांना भेटलो ते सर्व दुरूनच. तरी मित्राच्या सोबतीने दाराची बेल वाजवली. सावंत मँडमनी दरवाजा उघडला, आम्ही कोण वगैरे सांगितले, आम्हाला घरात घेतले आणि बसायला सांगून सावंतबाई आत गेल्या. थोड्या वेळाने सर आतल्या खोलीतून बाहेर आले. मी माझी ओळख सांगितली, त्यावर "साटम म्हणजे देवगडचे काय,” त्यावर मी माझं गाव सांगितले, बोलता बोलता मी माझ्या मामांचे गाव करंजे आहे सांगितले, त्यावर "अरे तुझे मामा म्हणजे आमचे शिमधडे.” शिमधडे म्हणजे ज्यांची गावे एकमेकांच्या सीमेला लागून आहेत ते रहिवासी एकमेकाला परस्परांचे शिमघडे म्हणतात. एकतर सावंत आडनाव आणि सावंतवाडीशी संबंध त्यामुळे मी सावंतसरांचे गाव सावंतवाडी असेच समजत होतो, पण सरांचे गाव कणकवली तालुक्यातील फोंडा. त्यात पुन्हा गप्पा सुरु झाल्या, गप्पांचे विषय कोकण सावंतवाडी, फोंडा, तिथली संस्कृती, कविता, कवितेची स्फुर्तीस्थाने, त्यांची उत्पत्ती. सर तेव्हा मुंबईत होते. पण त्यांचा जीव सावंतवाडीत अडकला होता. त्या सावंतवाडीला त्यांनी आपल्या कवितेत सुंदरवाडी म्हणून अमर करून ठेवले आहे. त्या वर्णनात "हे गाव म्हणजे परमेश्वराला पडलेले अधुरे स्वप्न असं म्हटले आहे,” याचे कारण ज्यांनी सावंतवाडी पहिली त्यांना लक्षात येईलच.

  सरांनी त्या पहिल्या भेटीत मला त्यांचा "स्वस्तिक” आणि "उगवाई” हे संग्रह दिले आणि "कविता वाच, कशी वाटते ते सांग” म्हणाले. त्याच दरम्यान सरांचे साहित्यिक गुरु कवी रमेश तेंडूलकर यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शनवर "प्रतिभा आणि प्रतिमा" या कार्यक्रमात बघायला मिळाली, तेव्हा सर आपल्या कवितेबाबत, आपल्या भूमिकेबाबत, तळकोकणातील श्रद्धा-अंधश्रद्धा, तेथील ग्रामसंस्कृती याबद्दल खूप बोलले. दिवाळी अंकांच्या माध्यमातून सरांच्या अनेक कविता वाचायला मिळत होत्या, त्यांनी त्याच दरम्यान पाचशे-सव्वा पाचशे ओव्यांचे "वर्सा”  नावाचे दीर्घकाव्य लिहिले होते. त्यातील काही अंश कुठल्या ना कुठल्या अंकात प्रसिद्ध होत होते. चंद्र, चांदण्या, आकाश, नदी, तलाव, तेथील देवस्थाने यांची प्रतीके वापरून श्रद्धा-भक्ती, निसर्ग आणि प्रीती याचा संगम मला त्यांच्या कवितेत वाचायला मिळाला. ती सौंदर्यलक्षी कविता नंतर कुठेच सापडली नाही एवढी ती अस्सल होती.

कोकणातील देवचाराचे नादचित्र उभे करताना त्यांनी अमेरिकन प्रेयसीचे चित्र देखील ताकदीने उभारले, एकाचवेळी योग आणि भोग यांचा विलक्षण संगम त्यांच्या कवितेत सापडत होता तरीही त्यांची कविता ही निसर्गाचे नानाविध रंग तोलताना दिसत होती. अष्टाक्षरी, दशाक्षरी कवितेतील लय आणि गेयता त्यांनी जेवढी समर्थपणे पेलली तेवढीच लांब स्ट्रेचच्या कविता त्यांनी लयबद्ध लिहिल्या. १९९६ च्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट, मला सावंत सर दुर्धर व्याधीने आजारी आहेत असं कळलं, पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम संपून मी सरांच्या घरी गेलो, आजाराची व्यथा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, मी गेलो तेव्हा कॉटवर लोडाला टेकून हातात पँड घेऊन कागदावर लिहीत होती. मी सरांच्या कॉटच्या जवळ असलेल्या खुर्चीवर बसलो तेव्हा मी तब्येतीची चौकशी केली. त्यावर "बरी आहे” म्हणत त्यांनी पुन्हा एक कागद जवळ घेतला आणि "ही कविता ऐक, हंसच्या अनंत अंतरकरांना पाठवायची आहे.” स्वतःची व्याधी विसरून सर कविता वाचू लागले.

"मिठी घालतो पाऊस सणसणे दूर वारा चिंब धरेच्या अंतरी फुटतात गंगाधारा
माझी नांगरट अशी भूमीवर नवे जोत फिरे गुठा किंवा दाता माती झाली मलमल”

 कविता संपली.. कशी वाटली कविता असं मला विचारलं, मी मान हलवली. सरांच्या कवितेतील मला काय कळणार ?..तरी सर कविता वाचत राहिले मी ऐकत राहिलो. पुढे सरांच्या प्रकृतीचे वर्तमान कळत राहिले. सरांची प्रकृती खालवत होती. १९९६च्या डिसेंबर महिन्यात कोमसापचे संमेलन सावंतवाडीला विंदांच्या अध्यक्षतेखाली भरणार होतं, त्यावेळी सरांना "कोकणसाहित्य भूषण”  हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार होते; पण सरांच्या प्रकृतीचा अंदाज घेता, सावंतवाडीला जाणं शक्य नव्हतं. त्यावेळी तत्कालीन मुंबई जिल्हा अध्यक्ष व सरांचे मित्र राजा राजवाडे यांनी सदर पुरस्कार संमेलनाच्या आधी सरांना मुलुंडच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये देण्याचा घाट घातला तेव्हा सरांच्या नव्याने येऊ घातलेल्या "सागरेश्वर” या कवितासंग्रहाचे प्रकाशनपण तेथे झाले..एकंदरीत एका कवीला त्याचा आयुष्यात आलेल्या विसंगतीचा तो अनुभव होता. त्यानंतर लवकरच सरांचे निधन झाले.

  आजही सावंत सरांच्या कवितेचे मराठी साहित्यात काय स्थान आहे ? तर त्या कवितेतील अस्सलपणा. साठोत्तरी कवितेत सरांच्या बरोबरीने अनेक सामजिक कवी लिहित होते, त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण होत असताना सरांनी आपल्या साैंदर्यलक्षी पिंडाशी प्रतारणा न करता आपल्या स्वभावधर्माची कविता लिहिली, त्यातून त्यांनी प्रादेशिक बोली, लोकसंस्कृती, ग्रामसंस्कृती, बैल, नांगरट सारख्या कवितेतून "कृषीसंस्कृती”अधोरेखीत केली. त्यांच्यासारखी अस्सल निसर्गकविता नंतरच्या काळात क्वचितच कोणाला लिहायला जमली. आज सर जाऊन पंचवीस वर्ष झाली तरी तळकोकणात बहरत जाणारी कविता बघून सरांचे ह्या कवितेला किती मोठे योगदान होते हे दिसून येईल
-वैभव साटम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वानंचा बाव !