‘एमएमआरडीए'च्या तिसऱ्या मुंबईला विरोध

उरण : मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (अटल सेतू) भोवती ‘तिसरी मुंबई' विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला १२४ गावांतील ग्रामस्थांचा विरोध केला आहे. या ग्रामस्थांनी २७ रोजी ‘एमएमआरडीए'च्या कार्यालयात सामुहिकरित्या हरकती नोंदविल्या आहेत. भांडवलदारांच्या फायद्यासाठी सरकार त्यांच्या समाजाला भूमीहिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी या हरकती नोंदविल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी शासनाकडे अनेक मागण्या मांडल्या आहेत. हरकती नोंदवण्यासाठी गावोगावी जनजागृती बैठका घेण्यात येवून, ग्रामपंचायतींनी योजनेच्या विरोधात ठराव करुन ते शासनाला दिले आहेत.

राज्य सरकारने ४ मार्च रोजी ‘एमटीएचए़ल'च्या आजुबाजुची १२४ गावे ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'च्या (एमएमआरडीए) अध्यक्षतेखालील न्यू टाऊन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (ऱ्ऊीं) कडे सोपवण्याची अधिसूचना जारी केली. उरण, पनवेल, पेण परिसरात सदर गावे आहेत. ‘तिसरी मुंबई'ने नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात ८० गावे, खोपटा न्यू टाउन अधिसूचित क्षेत्रातील ३३, मुंबई महानगर प्रदेश आराखड्यातील दोन आणि रायगड प्रादेशिक योजनेतून ९ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने आपल्या अधिसुचनेनंतर ३० दिवसांच्या आत सूचना-हरकती मागवल्या होत्या. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी स्थानिक शेतकरी, गावातील नेते, राजकारणी आणि कार्यकर्त्यांनी ‘एमएमआरडीए विरोध शेतकरी समिती'ची स्थापना करुन या प्रकल्पाविरोधात लढाई उभारण्याची तयारी  केली आहे.

‘एमएमआरडीए भूसंपादन विरोधी शेतकरी समिती उरण'च्या वतीने २७ मार्च रोजी कोकण भवन आयुक्तालय येथे एमएमआरडीए विरोधात माजी आमदार तथा रायगड शिवसेना प्रमुख मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत ‘एमएमआरडीए'चे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्याकडे सादर केल्या. यावेळी तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, सुधाकर पाटील, बी. एन.डाकी, कैलास म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते कुष्णा पाटील, मा.जि.प. सदस्य जीवन गावंड, ‘काँग्रेस'चे तालुकाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य विनोद म्हात्रे, खोपटे सरपंच विशाखा ठाकूर, गोवठणेच्या सरपंच प्रणिती म्हात्रे, वशेणीच्या सरपंच अनामिका म्हात्रे, सरपंच कलावती पाटील यांच्यासह ‘एमएमआरडीए भूसंपादन विरोधी शेतकरी समिती'चे सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीत शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड