‘आयुक्त आपल्या दारी' अभियान सुरु करण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबईकरांशी सुसंवाद ठेवण्यासाठी ‘आयुक्त आपल्या दारी' अभियान सुरु करण्याची मागणी ‘एमआयएम'चे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रभारी तथा ‘एमआयएम विद्यार्थी आघाडी'चे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांच्या नागरी समस्या सोडविण्याचे आणि नागरी सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील श्रीमंत महापालिकांमध्ये नवी मुंबई महापालिकेची गणना होत आहे. मोरबे सारखे स्वमालकीचे धरण या महापालिकेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य जनतेला आपणास भेटण्याची इच्छा असली तरी कार्यव्यस्ततेमुळे आपणास भेटता येत नाही. सुसंवाद साधता येत नाही. महापालिकेत आयुक्तांसह अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी केवळ राजकारणी, ठेकेदारच प्रामुख्याने येत असतात. सर्वसामान्य जनता महापालिकेत येण्याचे प्रमाण अत्यल्प आणि तुरळकच असते.

शनिवार, रविवार सर्वसामान्यांना सुट्टी असते. त्याचवेळी महापालिका कार्यालयही बंद असते. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि सर्वसामान्य नवी मुंबईकरांची गाठ-भेट होत नाही, सुसंवाद होत नाही. समस्यांबाबत ई-मेल केल्यावर आयुक्त कार्यालयातून अनेकदा समस्यांचे निवारण होतच नाही, केवळ मेल फॉरवर्ड करण्याचे काम केले जाते. काम झाले अथवा नाही ते जाणून घेण्याची तसदीही आयुक्त कार्यालयाकडून घेतली जात नाही, असा आमचा अनुभव असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी आयुवतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मध्यंतरीच्या काळात तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःहून सर्वसामान्य नवी मुंबईकरांना भेटण्यासाठी पुढाकार घेतला होता. ‘आयुक्त आपल्या दारी' अभियान चालविताना दर शनिवारी वेगवेगळ्या नोड मधील उद्यानात जावून तेथील स्थानिक लोकांच्या तुकाराम मुंढे भेटीगाठी घेत असत, नवी मुंबईकरांच्या समस्या जाणून घेत असत. त्यामुळे सकाळच्या वेळी अगदी ८ वाजता सर्वसामान्यांना आयुवत मुंढे यांना भेटणे, समस्या सांगणे शक्य होत असे. त्यानंतर सदर प्रथा खंडीत झाली अन्‌ आयुक्तांचा आणि नवी मुंबईकरांचा सुसंवादही खंडीत झाला. त्यामुळे आपणाकडून नवी मुंबईकर खूप आशावादी आहेत. वेळेअभावी त्यांना महापालिका मुख्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण स्वतः पुढाकार घेऊन नवी मुंबईकरांच्या भेटीसाठी ‘आयुक्त आपल्या दारी' अभियान सुरु करावे, अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माननीय उच्च न्यायालयाने पनवेल महापालिकेच्या  मालमत्ता कराला स्थगिती  दिली नाही