‘हापूस'ची चव सर्वसामान्यांच्या आवावयात

वाशी : यंदा मार्च महिन्यातच हापूस आंब्याच्या मुख्य हंगामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात १८ मार्च पासून हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाल्याने हापूस आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या ४०  हजार तर कर्नाटक येथील आंब्याच्या १० हजार मिळून एकूण ५० हजार पेट्या दाखल होत आहेत.
 
  हापूस आंबा पिकाच्या हंगामात मोहोर फुटण्याच्या वेळी अवकाळी पाऊस पडल्याने सुरुवातीच्या हापूस आंब्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे हापूस आंबा आवक कमी झाली  होती. आवक कमी असल्याने बाजारात  हापूस आंब्याचे दर चढेच होते. मात्र, देवगड, रत्नागिरी, रायगड या भागात यंदा हापूस आंब्याचे पीक चांगले आले आहे. हापूस आंब्याची तोडणी लवकर केल्याने एपीएमसी फळ  बाजारात गेल्या जानेवारी पासूनच आंब्याची आवक सुरु झाली होती. मात्र, मागील एक आठवड्यापासून हापूस आंब्याच्या आवक मध्ये वाढ होत चालली असून, एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या ४० हजार पेट्या दाखल होत आहेत.तर कर्नाटक मधील आंब्याच्या देखील १० हजार पेट्या दाखल होत आहेत. होळी नंतर एपीएमसी फळ बाजारात उत्तर भारतातील आंबा विक्रेत्यांची मागणी वाढणार असल्याने हापूस आंबा आवक आणखी वाढून ती ५० हजार पेट्या ते १ लाख पर्यंत जाणार आहे.
 
सध्याची हापूस आंब्याची आवक पाहता दर देखील ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. आधी २-४ डझन हापूस आंबा पेटीला २ ते ६ हजार रुपये असणारे दर आता १५०० ते ४ हजार रुपये पेटी झाले आहेत. तर कर्नाटक आंबा देखील १०० ते २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे हापूस आंब्याची चव सर्वसाधारण ग्राहकांना चाखायला मिळणार असून, यापुढील काळात जस-जशी आवक वाढेल तस-तसे हापूस आंब्याचे दर कमी होतील, अशी माहिती एपीएमसी फळ मार्केट संचालक संजय पानसरे यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी प्लाझा बस स्थानकाला खाजगी प्रवासी वाहनांचा गराडा