सिडको भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : सिडको तर्फे संपादित करण्यात आलेल्या जमीनीवर आणि भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. सदर डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानिकारक असल्याने सिडको भूखंडावर बेकायदेशीररित्या टाकण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्यासाठी सिडको प्रशासनाने कंबर कसली आहे.

‘सिडको'च्या पथकाने १९ मार्च रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तसेच उलवे परिसरात ‘सिडको'च्या जमिनीवर डेब्रिज टाकण्यासाठी निघालेल्या ५ डंपर्ससहित त्यावरील चालकांना  ताब्यात घेण्याची कारवाई केली. या कारवाईत ‘सिडको'च्या पथकाने पाचही डंपर जप्त केले आहेत.
सिडको महामंडळाने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठया प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून, डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानीकारक आहे. त्यामुळे ‘सिडको'च्या भूखंडावर टाकण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सिडको'चे दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग आणि पोलीस पथकाने १९ मार्च रोजी रात्री विशेष मोहिम राबविली. या मोहिम दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उलवे परिसरात ‘सिडको'च्या जमिनीवर डेब्रिज टाकण्यासाठी काही डंपर निघाल्याची माहिती ‘सिडको'च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सिडको पथकाने १९ मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सीबीडी मधील अपोलो हॉस्पिटल लगतच्या उरण मार्गावर धाव घेतली. यावेळी सदर ठिकाणी आलेले डंपर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तसेच उलवे परिसरात सिडकोच्या जमिनीवर डेब्रिज टाकण्यासाठी निघाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ‘सिडको'च्या पथकाने डेब्रीज टाकण्यासाठी निघालेले ५ डंपर्स सहित त्यावरील चालक कमलेश चौहाण, मोहमद मँफुज, गौतम महतो, नाजिर खान, विकास कुटे या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, सिडको कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास त्याबाबतची माहिती सिडकोच्या  www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तसेच संबंधित पोलीस ठाणे मध्ये द्यावी, असे आवाहन सिडको तर्फे करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवीन पनवेल मधील पाणीप्रश्न जटील