‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत लवकरच वाढ

खारघर : बेलापूर-पेंधर मार्गावर धावणाऱ्या ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत लवकरात लवकर वाढ करण्याचा ‘सिडको'चा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ने प्रवास करणाऱ्या तळोजा-बेलापूर मधील प्रवाशांची वाहतुक समस्या दूर होणार आहे.

१७ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ‘सिडको'ने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या आदेशानंतर ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ची सेवा सुरु केल्यानंतर तळोजा, खारघर, बेलापूर उपनगरातील प्रवाशांकडून ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार महिन्यात जवळपास १२ लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' मधून प्रवास केला असून, ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या तिकीट विक्रीतून  तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रवकम ‘सिडको'च्या तिजोरीत जमा झाली आहे.

दरम्यान, नवी मुंबई मेट्रो रेल्वे सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु आहे. रात्री दहा नंतर ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ची सेवा बंद केली जाते. त्यात खारघर रेल्वे स्थानकावर रात्री दहानंतर वेळेवर एनएमएमटी बस सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे  खारघर सेक्टर-३४, ३५ तसेच तळोजा मधील रहिवाशांना रिक्षाने प्रवास करताना दुप्पट रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनाने रात्री बारा वाजेपर्यंत ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' सेवा सुरु ठेवावी, अशी मागणी तळोजा, खारघर मधील नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेवून सिडकोकडून लवकरच ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत रात्री वाढ होणार असल्याचे समजते.

तळोजा, खारघर, बेलापूर परिसरातील नोकरदार आणि इतर सर्व यंत्रणेचा विचार करुन ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत रात्री एक तास वाढ करण्याचे नियोजन सुरु असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.

तिकीट दरात घट  
खारघर आणि तळोजा मधील वाढत्या लोकसंख्येमुळे ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ला अधिक पसंती मिळेल असे ‘सिडको'ला वाटत होते. मात्र, तिकीट दर जास्त असल्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे' मधून दैनंदिन १२ हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे मुंबई परिसरात सुरु असलेल्या ‘मेट्रो रेल्वे'चे भाडे १ ते ३ किलोमीटर अंतरासाठी १० रुपये, ३ ते १२ किलोमीटर अंतरासाठी  २० रुपये आणि १२ ते १८ किलोमीटर अंतरासाठी ३० रुपये इतके आकारले जात आहे. त्यात तळोजा फेज-२ मधील रहिवाशांना ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'ने प्रवास केल्यास खारघर स्थानक गाठण्यासाठी   बेलपाडा स्थानकापर्यंत ३० रुपये मोजावे लागत आहेत. तळोजा येथून वातानुकूलित एनएमएमटी बस मधून खारघर पर्यंत प्रवास केल्यास प्रवाशांना २५ रुपये मोजावे लागत आहेत. तर ‘एनएमएमटी'च्या   ५२, ४३ आणि ४५ मांकाच्या साध्या बस मधून तळोजा ते खारघर प्रवास केल्यास अनुक्रमे २२, १९, १७ रुपये मोजावे लागत आहेत.  तर पेंधर स्थानक तळोजा फेज-२ येथून खारघर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी बेलपाडा स्थानकापर्यंत ३० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या प्रवासी संख्येत वाढ व्हावी, यासाठी सिडकोकडून पेंधर ते बेलापूर दरम्यान मेट्रो रेल्वे भाडे कमी करण्याबाबत विचार विनिमय सुरु असल्याचे समजते.

नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ‘सिडको'ने २,९५४ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'चे तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रवासी संख्या ‘जैसे थे' असून  ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या उत्पनात वाढ व्हावी यासाठी काही स्थानकांवर बंद पॅकेट फूड विक्रीसाठी ‘स्टॉल'ला परवानगी देण्यासाठी आणि जाहिरातीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे, असे ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत वाढ व्हावी यासाठी प्रवाशी तसेच काही संघटनांकडून पत्र प्राप्त झाले आहे. ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत वाढ करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु आहे. - प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी - सिडको. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळवली, गोठिवली मधील ३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त