राजेंद्र घरत, चित्रा बाविस्कर यांची पुस्तके ब्रेल लिपीत प्रकाशित

नवी मुंबई छ ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत यांच्या दोन आणि नवी मुंबई महापालिकेच्या सचिव सौ.चित्रा बाविस्कर यांच्या एक अशा ब्रेल लिपीतील तीन पुस्तकांचे प्रकाशक घराडी, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील यश स्नेहा ट्रस्ट संचालित स्नेह ज्योती निवासी अंध विद्यालयात १७ मार्च रोजी नवी मुंबई महापालिका जनसंपर्क अधिकारी व कवी, निवेदक महेंद्र काेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्नेह ज्योती निवासी अंंध विद्यालयातील विद्यार्थी हे अंतःचक्षूंनी पाहतात, स्पर्शाने वाचतात. ही मुले इतरांच्या केवळ आवाजाने कोण आलंय ते ओळखतात. म्हणून या मुलांना दृष्टी नसली तरीही त्यांचा दृष्टीकोन व्यापक आहे असे म्हणावेसे वाटते असे यावेळी कोंडे म्हणाले. राजेंद्र घरत यांच्या ‘मासे असे नि तसे' व ‘प्युअर मराठी' या बाविसाव्या व तेविसाव्या तर नवी मुंबई महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांच्या ‘धमाल कमाल' या ब्रेल लिपीतील तेराव्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी पार पडले. सदर प्रसंगी विचारमंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा प्रणव सेनगुप्ता, सौ अश्विनी घरत उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी कोंडे यांचा सन्मानपत्र व दीप देऊन गौरव करण्यात आला.

    राजेंद्र घरत यांनी आपले ब्रेल लिपीत आपली आणखी दोन पुस्तके प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना गेल्या पंधरा वर्षात घराडीसारख्या दुर्गम भागात अशा पुस्तक प्रकाशनासाठी मुंबई, नवी मुंबई येथून विविध मान्यवरांना तेथे सोबत नेताना अतीव समाधान झाल्याचे सांगितले. घरातील वाढदिवस, विवाहांचे वाढदिवस कोणत्यातरी महागड्या हॉटेलांत वारेमाप पैसे खर्चून साजरे करण्याऐवजी तसेच दिवंगत मातापित्यांचे वर्षश्राध्द आदि प्रसंग पोट भरलेल्या लोकांनाच पुन्हा भोजन देऊन पार पाडण्यापेक्षा अशा संस्थांमध्ये जाऊन साजरे करा, त्या मुलामुलींना आपला सहवास द्या, त्यांचा तो दिवस गोड करा असे आवाहन आपल्या भाषणातून केले. चित्रा बाविस्कर यांनी यावेळी सौ. प्रतिभा सेनगुप्ता यांना असेच समाजसेवेचे काम करण्यासाठी व अधिकाधिक पुस्तकांना ब्रेल लिपीत रुपांतरीत करण्यासाठी ईश्वराने उर्जा पुरवावी अशी भावना व्यक्त करतानाच स्नेहज्योती शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मुलांच्या योग्य त्या संगोपनाची काळजी घेऊन शिक्षणाबरोबरच त्यांच्या अन्य कलागुणांना वाव दिल्याबद्दल कौतुकोद्‌गार काढले. येथील दृष्टीहीन मुलामुलींनी त्यांचे संगीत शिक्षक व्याघ्रांबरे यांच्या साथीने काही सुरेल गाणीही सादर केली. यावेळी शाळेतील दृष्टीहीन मुलांना खाऊ, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स तसेच सेविकांसाठी साड्यांचेही वाटप करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पर्यावरणपूरक होळी अभियानाचे संवाद सत्र