पनवेल महापालिकेची आजवरची सर्वात उच्चांकी वसुली

पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर संकलनामध्ये आजवरची उच्चांकी वसुली झाली आहे. १४ मार्च रोजी एका दिवसात २.२५ कोटी रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला आहे. ‘कर संकलन-कर आकारणी विभाग'च्या वतीने थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीपूर्व नोटीसा दिल्यानंतर आता मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. महापालिकेच्या आजवरच्या कारर्किदीमधील एका दिवसातील सर्वांत उच्चांकी कर वसुली आहे.

दुसरीकडे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे जप्तीपूर्व नोटीसानंतर ७ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना वॉरंट नोटिसा बजावण्याच्या कामास वेग आला आहे. १४ मार्च रोजी ९ वसुली पथकांच्या माध्यमातून तसेच ऑनलाईन आणि प्रत्यक्षपणे २.२५ कोटी रुपयांचा भरणा महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे झाला आहे.

आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु, आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या, अशा थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी कर अधीक्षक महेश गायकवाड आणि सुनील भोईर  यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाच्या माध्यमातून चारही प्रभागातून आजवरची उच्चांकी वसुली झाली आहे. या आर्थिक वर्षामध्ये सुमारे २८१ कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत ५६७ कोटी इतका मालमत्ता कर वसूल झाला आहे.

दरम्यान, मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन सातत्याने महापालिका कडून विविध माध्यमातून केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. गेल्या २-३ दिवसापासून मालमत्ता कर भरणाऱ्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात ३.५० लाख निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदि नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेने विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड' तयार केले आहे.

महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वायु प्रदुषण करणा-या केमिकल कंपनीवर कारवाई करण्यासाठी कामगारांचे मुक निषेध आंदोलन