‘सिडको'तर्फे बामणडोंगरी गृहसंकुलातील २४३ दुकाने विक्रीसाठी उपलब्ध

सीबीडीः ‘सिडको'तर्फे उलवे नोडमधील बामणडोंगरी गृहसंकुलातील २४३ दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजना अंतर्गत कनेक्टिव्हीटीच्या दृष्टीकोनातून परिपूर्ण असलेल्या उलवे नोडमध्ये २४३ दुकाने व्यावसायिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दुकाने विक्रीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला आज १४ मार्च पासून सुरुवात होणार आहे. 

सदर योजनेच्या माध्यमातून ‘सिडको'च्या उलवे नोडमधील बामणडोंगरी गृहसंकुलातील २४३ दुकाने ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियाद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सदर प्रक्रियेकरिता https://eauction.cidcoindia.com असे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. योजनेकरिता ऑनलाईन नोंदणीचा कालावधी १४ मार्च ते १३ एप्रिल २०२४ असा आहे. योजनेचा निकाल १५ एप्रिल २०२४ रोजी जाहीर करण्यात येईल.

उलवे नोडला रेल्वे आणि रस्ते यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. बामणडोंगरी येथील सिडको गृहसंकुलास नेरुळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी स्थानकाद्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच एमएटीएचएल सागरी सेतू पासून देखील या गृहसंकुलाचा परिसर नजिकच्या अंतरावर आहे. सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या सदर परिसराच्या विकासाकरिता ‘सिडको'चे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदर प्रेरक घटक ठरणार आहेत.

दरम्यान, ‘सिडको'तर्फे सातत्याने निवासी आणि वाणिज्यिक भूखंड, दुकाने, वाणिज्यिक जागा  यांच्या विक्रीच्या योजना राबविण्यात येतात. आजवर राबविण्यात आलेल्या योजनांना नागरिक, व्यावसायिक, विकासक आदि घटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या योजनेद्वारे उलवे परिसरामध्ये व्यवसाय वृध्दीची संधी व्यावसायिकांना उपलब्ध झाली असून विशेषतः मध्यम आणि लहान व्यावसायिकांकरिता सदर योजना अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. तरी अधिकाधिक व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.

‘सिडको'ने नवी मुंबईतील उलवे नोड या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरातील दुकानांच्या विक्रीची योजना सादर केली आहे. विशेषतः मध्यम आणि लहान व्यावसायिकांकरिता सदर योजना अत्यंत उपयुक्त ठरणारी असून अधिकाधिक व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतो. - विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण सह परिसरातील महापालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा