उरणच्या रस्त्यावर धुळीचे कण; रस्ते साफ करण्याची मागणी

 उरण : उरण तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शासकीय नियमांची पायमल्ली करुन माती आणि डेब्रीज भरलेल्या डंपरची रेलचेल सुरु आहे.त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य दिसून येत आहे. या धूळ आणि खड्ड्यांचा सामना करीत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कारोना नंतर पुन्हा एकदा तोंडाला मुखपट्टी (मास्क) लावून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. तरी रस्त्यावरील वाढणारे प्रदुषण टाळण्यासाठी रस्त्यावर पसरणारी माती हटविण्यात यावी, यासाठी हातात बॅनर घेऊन ‘शेकाप'चे युवा तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी अनोखे आंदोलन छेडले आहे.

उरण तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवरुन दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. या अवजड वाहनांच्या तुलनेत ग्रामीण भागातील बांधलेले रस्ते कमकुवत आणि निकुष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे रस्ता तयार केल्यानंतर काही महिन्यांतच या रस्त्यांना भले मोठे खड्डे पडतात. अशा खड्ड्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे कण हवेत पसरत आहेत. त्यात सध्या तालुक्यातील सर्रास रस्त्यावरुन माती, डेब्रीज भरलेल्या डंपरची रेलचेल असल्याने रस्त्यावर सांडणारी आणि हवेत पसरणारी माती प्रवाशी, वाहन चालकांच्या नाका-तोंडांत जाऊन नागरिकांना, वाहन चालकांना श्वसन विकाराचा सामना करावा लागत असून अनेक नागरिकांना सर्दी, खोकला याचबरोबर दमा सारख्या आजारांनी ग्रासले आहे.

उरण तालुक्यातील वाढते प्रदुषण टाळण्यासाठी आणि ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच रस्त्यावर पडणारी माती हटविण्यासाठी ‘शेकाप'चे युवा तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी नुकताच हातात बँनर घेऊन अनोळख्या स्वरुपाचे आंदोलन उभारुन निद्रिस्त प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये सलग दुसऱ्या दिवशी १ कोटीहुन अधिक कर वसुली