रुफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा

मुंबई : घराच्या छपरावर रुफ टॉप सोलर सिस्टीम बसवून ३०० युनिट पर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना'मध्ये ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण'च्या भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.

वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या सदर योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण'ला केली आहे, असे सुनिल काकडे यांनी सांगितले.

‘रुफ टॉप सोलर सिस्टीम'साठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला १ किलोवॅट साठी ३० हजार रुपये, २ किलोवॅट साठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅट साठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रुफ टॉप सोलर सिस्टीम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रफ टॉप सोलर सिस्टीम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsueryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी सदर योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा.

१ किलोवॅट क्षमतेच्या रुफ टॉप सोलर सिस्टीममधून दररोज सुमारे ४ युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना १५० युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला २ किलोवॅट पर्यंतच्या क्षमतेची रुफ टॉप सोलर सिस्टीम पुरेशी आहे. दरमहा १५० ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी २ ते ३ किलोवॅट क्षमतेची सिस्टीम पुरेशी ठरते.

घराच्या छतावर रुफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून ‘सौरऊर्जा'चा वापर करुन वीजनिर्मिती करायची आणि ती वीज घरी वापरुन विजेची गरज पूर्ण करायची, अशी सदर योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. परिणामी, जास्तीची वीज ‘महावितरण'ला विकून उत्पन्नही मिळते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आरोग्य वर्धिनी केंद्र'द्वारे अल्पशा दरात आरोग्य सेवा