‘ती महोत्सव'चे दिमाखदार उद्‌घाटन

ठाणे : सलग १६ वर्षे ‘जागतिक महिला दिन' निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘ती महोत्सव'चे दिमाखदार उद्‌घाटन संपन्न झाले. यंदाच्या ‘ती महोत्सव'मध्ये १७ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे १७ मार्च पर्यंत चालणाऱ्या ‘ती महोत्सव'मध्ये विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

बचत गट, महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी. तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे ‘ती महोत्सव'चे आयोजन करण्यात आलेले आहे. माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, सौ. माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ‘फाऊंडेशन'चे डॉ. राजेश मढवी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, ‘समर्थ भारत व्यासपीठ'चे संचालक उल्हास कार्ले, भाजपा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत ‘ती महोत्सव'चे उद्‌घाटन संपन्न झाले.  

‘ती महोत्सव'च्या निमित्ताने ११ मार्च रोजी योग स्पर्धा संपन्न झाली. तर १२ मार्च रोजी टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा, १३ मार्च रोजी पाककला स्पर्धा, १४ मार्च रोजी चित्रकला स्पर्धा, १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता आरोग्य तपासणी शिबीर तर सायंकाळी ५ वाजता लहान गटाच्या नृत्य स्पर्धा, १६ मार्च रोजी मोठ्या गटाच्या नृत्य स्पर्धा तर समारोपाच्या दिवशी सायं.५ वाजता ‘खेळ पैठणी'चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचसोबत ‘महोत्सव'ला भेट द्यायला आलेल्या ग्राहकांमधून रोज लकी ड्रॉ काढण्यात येत असून भाग्यवान ग्राहकांना भरघोस पारितोषिके देण्यात येणार आहेत.

उद्‌घाटनाच्या दिवशी डॉ. मधुरा कुलकर्णी, डॉ. खुशबू तावरी, रश्मी जोशी, डॉ. गौरांगी करमरकर, संगीता जोशी, लीलाताई गजरे, सरोज वारके, डॉ. शोभा थत्ते, प्रतिभा राव, गीतांजली लेन्का, सायली सावंत, डॉ. संगीता कार्ले, रश्मी जेडे, स्वाती पाटील, वैशाली देवस्थळी, डॉ. निलिमा कुलकर्णी, प्राची डिंगणकर आदि १७ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अर्थसंकल्पाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी