ठाणे शहरासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे प्रकाशन

ठाणे : ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे  (Heat Action Plan)  प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘नमो महारोजगार मेळावा'मध्ये करण्यात आले. वाढत्या नागरीकरणांमुळे, शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेचा धोका नियंत्रण करण्यासाठीचा सर्वंकष आराखडा महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका आणि कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट ॲण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) अशी वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.
या कृती आराखड्याच्या प्रकाशन प्रसंगी व्यासपीठावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सीईईडब्ल्यू संस्थेचे विश्वास चितळे, आदि उपस्थित होते.

उष्णता उपाययोजना कृती दल...    
हरीत वायूच्या वाढत्या उत्सर्जनामुळे शहरातील तापमानामध्ये वाढ होत आहे. समुद्र, खाडीकिनाऱ्याच्या शहरांमध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तापमान ३० डिग्रीपेक्षा जास्त असते आणि हवेच्या आद्रेचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त असते. तेव्हा शरीराला जाणवणाऱ्या तापमनामध्ये ३ ते ४ अंशांची वाढ जाणवते. त्यामुळे उन्हाचा त्रास जास्त जाणवतो. सर्वसामान्य नागरीक, शालेय विद्यार्थी, कामगार यांच्यावर होणारा अती तीव्र उष्णतेचा परिणाम नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उष्णता नियंत्रण उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये, ठाणे शहरासाठी उष्णता उपाययोजना कृती दल  (Heat Wave Task Force) स्थापन करण्यात आले आहे.

प्रमुख उद्दिष्टे...      
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार उष्णतेचा कालावधी सातत्याने वाढत असून त्याच्या तीव्रतेची वारंवारिता धोक्याची  घंटा आहे. या कृती आराखडासाठी सन १९८२ ते २०२४ या कालखंडातील वातावरणाची माहिती तसेच प्रत्यक्षातील सामाजिक-आर्थिक स्तर, उपग्रहावरून प्राप्त झालेली माहिती आधारभूत धरण्यात आली आहे. त्याचे ठाणे महापालिकेच्या प्रभागनिहाय संकलन करण्यात आले आहे. शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेच्या परिमाणाची मानके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे उष्मा जास्त झाल्यावर, शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाटेबद्दलची धोक्याची सूचना आगाऊ देता येईल.

सदर उष्णता नियंत्रण-उपाययोजना कृती आराखडा २०१९च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार झाला आहे. अति तीव्र उष्माघाताने होणारे मुत्यू रोखणे, तीव्र उन्हाळ्यामुळे होणारे आजार रोखणे, तसेच, त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करणे, असे या कृती आराखड्याचे मुख्य उद्देश आहे.

ठाणे शहराने वातावरणीय बदलाला सामोरे जाण्यासाठी सक्रिय पाऊल उचलले आहे. त्याअनुषंगाने उष्णता नियंत्रण-उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदर महत्त्वाचे पाऊल आहे. सदर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. त्यात महापालिकेच्या संबंधित विभागातील नोडल अधिकाऱ्यांची आणि तज्ञ संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सदर समिती कौशल्यपूर्णतेने कृती आराखड्याची अंमलबजावणी करेल. कृती आराखडा महाराष्ट्राचा वातावरण बदलाशी सामना करण्याच्या निग्रहाचे उदाहरण आहे. तो इतर शहरांसाठी मार्गदर्शक ठरेल.
-अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका.

महाराष्ट्र राज्य आजवर उष्माघाताचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज राहिले आहे. ठाणे शहरासाठी केलेला उष्णता उपाययोजना कृती आराखडा मोठी प्रशंसीय गोष्ट आहे. अत्यंत बारकाईने केलेल्या या कृती आराखड्यामध्ये स्थानिक पातळीवर, सध्याचा आणि भविष्यात येणाऱ्या उष्णतेच्या धोक्याबाबत, आवश्यक असलेली परिपूर्ण तयारी व प्रतिसाद धोरण याची माहिती दिलेली आहे. कृती आराखड्यामध्ये नमूद केलेल्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास ठाणे शहर वातावरणाच्या बदलाशी जुळवून घेणारे एक स्मार्ट शहर होईल, असा विश्वास आहे. - सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह-सामान्य प्रशासन विभाग).

कृती आराखडा स्थानिक पातळीवर महापालिकांनी समर्थपणे वातावरण बदलाला सामोरे जाण्याची दिशा स्पष्ट करतो. यात स्थानिक पातळीवर उष्णतेच्या परिमाणाची मानके तयार करुन प्रभाग समितीनिहाय त्याचे मपिंग केलेले आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे मनुष्य प्राण्यांचे जीवन व जीवनमान या दोन्हींवर परिणाम होत आहे. त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने सदर कृती आराखडा उपयुक्त आहे. - डॉ. अर्णव घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी - सीईईडब्ल्यू. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 करवाढ-दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर