पथदिव्यांमुळे उड्डाणपुलाखालील भाग प्रकाशमान

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहराचे सौंदर्यीकरण करताना केवळ काही चौक आणि मुख्य जागा यापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण शहरात सुशोभिकरणाचे व्यापकत्व प्रदर्शित व्हावे यादृष्टीने शहर सुशोभिकरणावर लक्षणीय भर दिला आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने रात्रीच्या वेळी देखील शहराचे सौंदर्य खुलून दिसावे यासाठी खास पथदिवे लावण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने नुकतेच ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली ते रबाले दरम्यान असलेल्या ‘एमएमआरडीए'च्या उड्डाणपुलाखाली विशिष्ट प्रकारचे पथदिवे लावले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाखालील भाग प्रकाशमान झाल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.  

शहर सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून नवी मुंबई महापालिका कडून शहरात भित्तीचित्रांद्वारे स्वच्छता आणि पर्यावरणविषयी जनजागृती करण्यात आली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली ते रबाले या दरम्यान ‘एमएमआरडीए'च्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या खालच्या भागात, तसेच पुलाच्या खांबावर देखील आकर्षक अशी विशिष्ट प्रकारची चित्रे रेखाटली आहेत. दिवसा उड्डाणपुलाखालील सदर आकर्षक चित्रे पाहता येत असले तरी, रात्रीच्या सुमारास उड्डाणपुलाखाली अंधार राहत असल्यामुळे सदर चित्रे दिसेनासे होत होती. त्यामुळे महापालिका विद्युत विभागाने या उड्डाणपुलाखाली विशिष्ट प्रकारचे पथदिवे उभारले आहेत.  

सदर पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर तसेच उड्डाणपुलाच्या खालील पृष्ठभागावर असलेल्या चित्रांवर पडले अशा पध्दतीने २ लाईटस्‌ बसविण्यात आले आहेत. या पथदिव्यांमुळे सदर उड्डाणपुलाच्या खाली काढण्यात आलेल्या स्वच्छताविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेने रंगवलेली चित्रे रात्रीच्या सुमारास आकर्षक रोषणाईमुळे उजळून निघत आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. विशेष म्हणजे सदर ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोलच्या आतून देखील लाईटस्‌ सोडण्यात आल्याने तेथील परिसर आणखीनच आकर्षक झाला आहे.  

‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये नेहमीच राज्यात अग्रभागी राहिलेल्या नवी मुंबई महापालिका कडून शहरात भित्तीचित्रांद्वारे स्वच्छता आणि पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगतच्या भिंतींसह उद्यान, सार्वजनिक ठिकाणच्या मोक्याच्या भिंती तसेच महापालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या भिंतींवर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच नवी मुंबई शहरातील विविध चौकांमध्ये संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे आकर्षक देखावे देखील साकारण्यात आलेले आहेत.

ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली ते रबाले यादरम्यान ‘एमएमआरडीए'च्या उड्डाणपुलाखालील भागात विशिष्ट प्रकारचे २२ इलेक्ट्रीक पोल उभारण्यात आले आहेत. येथील उड्डाणपुलाखालील रस्ता प्रकाशमान होण्याबरोबरच उड्डाणपुलाच्या पृष्ठ भागावर काढण्यात आलेली भित्ती चित्रे देखील उजळून दिसतील, अशा पध्दतीने या ठिकाणी पथदिवे उभारण्यात आले आहेत. सदर कामाला २४ लाखांचा खर्च झाला आहे. - प्रविण गाडे, कार्यकारी अभियंता (विद्युत)-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिटी पार्क'मध्ये तिकीटांसाठी तासभर रांग