पनवेल महापालिकेची मालमत्ता जप्ती मोहीम

पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर संकलन-कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका सुरु केला आहे. आतापर्यंत  पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये २८० हून अधिक जप्तीपूर्वीच्या नोटीसा  थकबाकीदार मालमत्ता धारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार मार्च महिन्यात जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु, आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांचा खूप जास्त मालमत्ता कर भरावयाचा राहिला आहे, अशा सुमारे १०१ औद्योगिक, १०७ अनिवासी, १०० निवासी थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द करण्यात आली. या थकबाकीदारांना आता जप्तीपूर्व नोटीसा देण्याचे काम महापालिकेने युध्दपातळीवर सुरु केले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात ३.५० लाख निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदि नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 2६4 कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड' तयार केले आहे. ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्यासाठी  panvelmc.org  या वेबसाईटवर जाऊन पे प्रॉपर्टी टॅक्सवर जाऊन आपला मालमत्ता सांकेतिक क्रमांक, नोड, सेक्टर क्रमांक, प्लॉट क्रमांक टाकल्यास मालमत्ता धारकाचे बिल पहावयास मिळेल. अंशतः कराची रक्कम भरण्यासाठी देखील येथे ऑप्शन आहे. त्यानंतर पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन मालमत्ताधरकांना दिसतात.

जप्ती पथकाच्या कारवाईमध्ये खारघर येथे जप्ती पथकाकडून ग्लोमॅक्स मॉलला जप्ती पूर्व नोटीस देण्यात आली. याचबरोबर कामोठो मध्ये वॉर्डन सर्जिकल प्रायव्हेट कंपनी, एस. एम. पाटील हांडे कंपनी, एशियन ऑईल कंपनी यांना जप्तीपूर्व नोटीस देण्यात आली आहे. नवीन पनवेल मधील रिध्दी सिध्दी रेसिडन्सी यासह विविध थकबाकीदारांनाही नोटीसा देण्यात आल्या आहेत.

मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन सातत्याने रिक्षामधून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून चारही प्रभागांमध्ये केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.orgया वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

 मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340  या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

४८८ ग्राहकांची नळ जोडणी खंडीत