संकल्पित रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक' नाव देण्याची मागणी

ठाणे : ठाणे आणि मुलुंड यादरम्यान होऊ घातलेल्या नवीन रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीनकाळातील मूळ नाव ‘श्रीस्थानक' दिले जावे. तसेच देशातील पहिले रेल्वे स्टेशन म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ‘ठाणे'मधील संस्कृतीचे प्रभावी  दर्शन घडविले जावे, अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केल्या आहेत.

विनय सहस्त्रबुध्दे यांच्या आग्रहावरुन ‘मध्य रेल्वे'चे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी ठाणे स्थानकाला भेट देऊन प्रवाशी सोयी-सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच सदर महत्वाच्या मागण्या त्यांच्याकडे केल्या. नवीन रेल्वे स्थानकाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात यावे. ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, कल्याण-वाशी, ठाणे ते वाशीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे-वसई या लोकल सेवा सुरु कराव्यात. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त बिना आरक्षित डबा जोडण्यात यावा. अधिकाधिक मेल-एक्सप्रेस गाड्यांना जाता-येता ठाणे येथे थांबा द्यावा. प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व-पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर-दक्षिण पुल निर्माण करणे. स्वछतागृहांसकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमती देखभाल आदि मागण्या विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली ‘भाजपा'च्या शिष्टमंडळाने केल्या.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘प्रवासी संघटना'चे मिलिंद बल्लाळ, नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी, सरचिटणीस विलास साठे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, निलेश कोळी, श्रुतिका मोरेकर, अमरीश ठाणेकर तसेच अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शाळेत न जाणाऱ्या मुले-मुलींसाठी शाळाच त्यांच्या दारी