फुकटात चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना आता पायबंद

वाशी : राज्यात अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर लावणाऱ्या राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सर्वच महापालिकांना दिले आहेत. सदर आदेश पारित होताच ठाणे महापालिका तर्फे अवघ्या चार तासात ठाणे शहरातील ९०० पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर काढण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरात देखील अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर हटविण्याची कारवाई केली जाईल का?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरात एखादा राजकीय कार्यक्रम असो, कुणा नेत्याचा वाढदिवस असो की कुठला सणवार, या दिवसात नेत्याप्रती प्रेम दाखवणाऱ्या कार्यकर्त्याच्या प्रेमाला उधाण आलेले असते. या प्रेमाच्या उधाणात शहरातील चौक, रस्ते, दुभाजक अनधिकृत बॅनर, होर्डिंग यांनी बहरलेले असतात. अनधिकृत बॅनरबाजी विरोधात कारवाई करावी, असे आदेश २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने सर्वच महापालिकांना दिले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी होत नसून जागो-जागी पुन्हा एकदा बॅनरबाजी सुरु झाली आहे. या विरोधात न्यायालयाने स्वतः हुन याचिका दाखल केली आहे. तसेच सातारा येथील एका सामाजिक संस्थेने देखील याचिका दाखल केली आहे. या याचिकावर सुनावणी सुरु असताना राज्यासह मुंबई शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पंतप्रधानांच्या छायाचित्रांसह सर्वच राजकीय पक्ष रस्तोरस्ती बेकायदा होर्डिंग आणि बॅनर लावत असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सर्वच राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे निर्देश सर्वच महापालिकांना देत याचिकेची सुनावणी ६ मार्च २०२४ पर्यंत तहकूब ठेवली आहे. सदर आदेशानंतर ठाणे शहरातील तब्बल ९०४ अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर ठाणे महापालिका तर्फे हटविण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर कधी हटविण्यात येणार? आणि नवी मुंबई शहरात अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावून फुकटात चमकोगिरी करणाऱ्या राजकीय नेत्यांवर महापालिकाकडून कारवाई कधी होणार?, असा प्रश्न सुजाण नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना फटका?
महाराष्ट्र राज्यात अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर लावणाऱ्या राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर लावणाऱ्या राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याने अनधिकृत राजकीय फलकबाजीला चाप बसणार असून, राजकीय पक्षांना नोटीस निघाली तर त्याचा फटका राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवी मुंबई शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंगवर नवी मुंबई महापालिका द्वारे विभागवार कारवाई नेहमीच सुरु असते. त्यामुळे अनधिकृत बॅनरबाजी केल्याप्रकरणी कुणा राजकीय पक्षाला नोटीस बजावली आहे का?, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. - डॉ. अजय गडदे, सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची जरांगेची मागणी योग्य - माजी खा. हरिभाऊ राठोड