‘पनवेल'चा ३९९१.९९ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर

पनवेल : पनवेल महापालिकेचे सन २०२४-२५चे ३९९१.९९ कोटींचे वस्तुनिष्ठ, विकासाभिमुख कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक २३ फेब्रुवारी रोजी मुख्य लेखा-वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. महापालिकेच्या या अंदाजपत्रकामध्ये महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक संचालक (नगररचना) ज्योती कवाडे, मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे, उपमुख्य लेखा परीक्षक संदीप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे, सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.

महिलांच्या सशक्तीकरणावर भर देणाऱ्या या अंदाजपत्रकामध्ये महिला-बालविकास योजनांसाठी २२५.५० कोटी इतकी रक्कम अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आली आहे.
पनवेल सुकन्या योजनाः मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत करणे (पिवळे/केशरी रेशनकार्ड धारक). पनवेल महापालिका क्षेत्रातील मुलीच्या जन्मानंतर मुलींना ३०,००० रुपये आणि पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांच्या दोन्ही मुलींना प्रत्येकी ३०,००० रुपये असे एकूण एका कुटुंबास ६०,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्यः प्रति लाभार्थी युवतीस अभ्यासक्रमास येणाऱ्या खर्चापोटी प्रतिवर्ष ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.

याशिवाय महापालिकेच्या वतीने महिला-युवतींसाठी आरोग्य आणि व्यवतीमत्व विकास-संवर्धन, स्वयंरोजगार, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण, मुली आणि महिला खेळाडुंकरिता क्रीडा विषयक विविध उपक्रम राबविण्याचे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

 बांधकाम विभागः महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती, काँक्रीटीकरण, डांबरीकरण तसेच इतर सुविधांसाठी ५७० कोटी रुपयांच्या निधीची या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘स्वराज्य' नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २३४ कोटी आणि महापौर निवासस्थानासाठी १४५ कोटी तसेच नवीन प्रभाग कार्यालये बांधण्यासाठी ३८ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. प्राथमिक शाळा आणि माता-बालसंगोपन रुग्णालय बांधकामासाठी ५६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

‘सीसीटिव्ही'साठी व्यवस्थाः महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांची सुरक्षा तसेच एकूणच सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अंदाजपत्रकात १६५ कोटी रुपयांची भरीव तरतूद महापालिकेने केली आहे.

प्राथमिक शिक्षण होणार डिजीटलः पनवेल महापालिकेच्या वतीने इंग्रजी माध्यम शाळेचा सिनीअर केजी वर्ग गतवर्षी सुरु करण्यात आला होता. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पालकांचा प्रतिसाद पाहून महापालिकेने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यादृष्टीने यावर्षीचे नियोजन पूर्ण झाले आहे. शहरातील दि. बा. पाटील विद्यालयामध्ये पहिले ते पाचवी पर्यंत वर्ग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बदलत्या काळाप्रमाणे महापालिकेच्या  प्राथमिक शाळांमध्येही ‘ई-लर्निंग'ची सुविधा महापालिका देणार आहेत. तसेच ‘जिल्हा परिषद'कडून हस्तांतरीत झालेल्या शाळांचे नुतनीकरण आणि पुर्नबांधणी यासाठी १३५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वैद्यकिय सेवाः महापालिकेने मागील अर्थसंकल्प वैद्यकिय सेवांच्या बळकटीकरणावर भर देणारा बनविला होता. त्याप्रमाणे महापालिकेने १४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५ आरोग्यवर्धिनी केंद्रांची उभारणी, १ आपला दवाखाना याची उभारणी केली आहे. यावर्षी देखील महापालिका कडून वैद्यकिय सेवा आणि आरोग्य विषयक कार्यक्रम तसेच अकस्मित कारणांसाठी ९८ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

पाणी पुरवठा-पायाभूत सुविधाः पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी १४१ कोटी, शासन पुरस्कृत अमृत २.० अंतर्गत १४५ कोटी आणि स्वच्छ भारत योजना अंतर्गत १८ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. बाग आणि उद्याने यांच्या विकासाकरिता ११० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडांगणांच्या विकासासाठी २१ कोटींची भरीव रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासः पनवेल शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे या हेतुने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.

घनकचरा संकलनः शहर सुशोभिकरणाबरोबरच घनकचरा संकलन आणि त्यासाठी लागणारी सामुग्री, वाहने, मनुष्यबळ यासाठी १४९ कोटींचीी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भुयारी गटार आणि मलनिःस्सारण विभागासाठी १७२ कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

एकंदरीतच आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते अशा गुणवत्तापूर्ण पायाभूत सोयीसुविधा याबरोबरच शहर सुशोभिकरण, झोपडपट्टी पुनर्विकास अशा महत्वाच्या गोष्टीचीही सदर अंदाजपत्रकात अंतभर्ुत करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या गरजा ओळखून विकासामुख आणि लोकाभिमुख कोणतीही दरवाढ नसलेले असे महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. -गणेश देशमुख-आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार -मुख्यमंत्री