खारघर सेक्टर-१२ मध्ये दुषित पाणीपुरवठा

खारघर : खारघर, सेक्टर-१२ मधील काही सोसायटीमध्ये जवळपास १५ दिवसापासून दुषित पाणी पुरवठा होत असून यामध्ये आळ्या देखील निदर्शनास आल्या आहेत. ‘सिडको'ने गळती होत असलेल्या दुषित जलवाहिन्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी सेक्टर-१२ मधील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

खारघर, सेवटर-१२ बीयुडीपी वसाहत मधील ई-टाईप शिवसागर, सूर्योदय, समुद्रिका या सोसायटी तसेच एफ-टाईप लाईन हिरा आणि इतरही काही सोसायट्यांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असून त्यामधून घाणेरडा वास देखील येत आहे. दुषित पाण्यामुळे काहींना उलटी जुलाबची लागण झाली आहे. ‘सिडको'च्या सूचनेनुसार ३ वेळा सोसायटीच्या टाक्या स्वच्छ करुन घेण्यात आल्या. मात्र, परिस्थिती जैसे थे असून पाण्यात आळ्या निदर्शनास येत आहे.

आता पुढील काही दिवसात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. दुषित पाण्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना उलटी, जुलाबाची लागण झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची भिती पालकांमध्ये पसरली आहे. दरम्यान, दुषित पाण्याची सदर समस्या १० दिवसापासून सिडको अधिकारी आणि स्थानिक माजी नगरसेवकाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यात सुधारणा झालेली नाही. ‘सिडको'ने वेळीच उपाययोजना करुन दुषित पाणी समस्या दूर करावी, अशी मागणी खारघरवासियांकडून केली जात आहे. ‘सिडको'च्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, जेसीबीने खोदकाम करुन दुषित पाण्याचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सिडको'कडून दुषित पाणी पुरवठा होत असून त्यास घाणेरडा वास येत आहे. तसेच पाण्यामध्ये बारीक आळ्या निदर्शनास येत आहे. दुषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाब होण्याचे प्रमाण वाढले आहे. -स्नेहा पाटील, शिवसागर सोसायटी, सेक्टर-१२, खारघर. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिका तर्फे भव्य मिरवणूक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न