‘नैना'मध्ये युडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक -उद्योगमंत्री

नवी मुंबई : सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकत्रिकृत विकास नियंत्रण-संवर्धन विनियमन (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात १२ फेब्रुवारी रोजी नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, आ. बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, बबन पाटील, रामदास शेवाळे, अरुणशेठ भगत तसेच संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता नैना विशेष नियोजन प्राधिकरण ‘सिडको'ने निर्माण केले आहे. या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील १७५ गावांचा समावेश आहे. सदर नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये २३ गावांची अंतरीम प्रारुप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित १५२ गावांची प्रारुप विकास योजना १६ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या अधिसुचनेनुसार मंजूर झाली आहे. नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असेही ना. उदय सामंत यांनी बैठकीत सांगितले.

‘खादी ग्रामोद्योग मंडळ'च्या विविध प्रश्नांबाबत बैठक...
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कोकण भवन येथे ‘महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ'च्या विविध प्रश्नांबाबत ‘खादी ग्रामोद्योग मंडळ'चे अध्यक्ष रविंद्र साठे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंतर्गत ‘खादी ग्रामोद्योग मंडळ'च्या हात कागद संस्था, पुणे यासाठी १ कोटी रुपये आणि ‘खादी भवन'च्या इमारत दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये अनुदान देण्याला ना. सामंत यांनी तत्वतः मान्यता दिली. विश्वकर्मा योजना ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘जिल्हा परिषद'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. यंदा महाबळेश्वर परिसरात ‘कारवी' मध उपलब्ध होणार असून या मधाच्या मार्केटींग साठी स्वतंत्र योजना करण्यावरही विचार करण्यात आला. ‘खादी ग्रामोद्योग मंडळ'ची रिक्त पदे भरणे, ‘खादी ग्रामोद्योग मंडळ'च्या विविध उत्पादनाची विक्री आणि त्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणारा मॉल याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठान, मु.पो. जासई, ता.उरण यांच्या निवेदनाच्या ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ‘संस्था'चे अध्यक्ष अतुल पाटील आणि संचालक उपस्थित होते. त्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक विचार करेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठा आंदोलन दरम्यान सहकार्य;  सकल मराठा समाज तर्फे महापालिका आयुक्तांचे आभार