स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये महापालिकेच्यावतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’

पनवेल : पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पनवेल महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कृष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानातून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचा-यांची स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’स्पर्धा घेण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024  दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहेत. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत  खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी उपायुक्त गणेश शेटे,मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,डर्मेटॉलॉजी असोशिएशनचे डॉ.कुलकर्णी, अलर्ट इंडिया एनजीओचे अँथनी डिसौजा, महाराष्ट्र कुष्टपिडीत संघटनेचे अध्यक्ष अशोक अंबेकर,रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामदास झोडपे, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आरोग्य् अधिकारी, मुख्यालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी तसेच कर्मचारी, एएनएम,जीएनएम,आशा वर्कर्स, वॉर्ड बॉय, खारघर गाव जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे उपायुक्त गणेश शेटे यांनी हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेस सुरूवात झाली. स्पगेटी, विबग्योर शाळा, मोनार्च लक्झरी चौक, सेक्टर 18, मुर्बी गाव स्मशान भूमी चौक ,सेंट्रल पार्क ब्रीज येथे संपली. स्पर्धेच्या सुरूवातीला  मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी उपस्थितांना कुष्ठरोगाविषयी जनजागृतीपर माहिती दिली व समारोपावेळी उपस्थितांचे आभार मानले.  ‘कुष्ठरोग निमुर्लनासाठी त्वरा करा, कुष्ठरोगास बहुविध औषधोपचारासाठी प्रवृत्त करा’ अशा आशयाचे फलक यावेळी कर्मचाऱ्यांनी हाती घेतले होते. उपायुक्त गणेश शेटे यांच्या हस्ते मॅरेथॉनमधील विजेत्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कळवा परिसरात ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम' संपन्न