सानपाडा श्री दत्त मंदिराजवळील रखडलेले काम मार्गी

नवी मुंबई : सानपाडा येथील श्री दत्त मंदिराच्या दिशेन जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे रखडलेेले काम ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्य आणि प्रयत्नांमुळे पुन्हा मार्गी लागणार आहे. या रखडलेल्या सर्व्हिस रोड आणि संरक्षक भिंतीच्या कामासाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

प्राप्त निधीतून ३.१ कोटी रुपये सर्व्हिस रोडसाठी तर संरक्षण भिंतीसाठी ८३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. सानपाडा येथील श्री दत्त मंदिराजवळील रखडलेल्या सदर कामासाठी सानपाडा देवस्थान मंडळासह इतर नेतेमंडळी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होेते. पण, त्यांना अनेक अडचणी येत होत्या.

सानपाडा मधील श्री दत्त मंदिर जागृत देवस्थान आहे. याठिकाणी श्री दत्त जंयतीदिनी यात्रा जत्रा भरते आणि या यात्रेला हजारो भाविक दर्शनाला येत असतात. परंतु, काही वर्षांपासून श्री दत्त मंदिरामध्ये जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी तेथील रस्ता अरुंद पडत असे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या तसेच त्यांच्यागाड्या ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. याठिकाणी हजारो भाविक भंडाऱ्याच्या लाभ घेतात, तेथेही फार गैरसोय होत होती.

सदर बाब लक्षात घेऊन सानपाडा ग्रामस्थांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे सदर कामाबाबत मागणी केली. यानंतर आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी देखील तातडीने सदरचा अनेक वर्षांचा प्रश्न हाती घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन शासनाच्या माध्यमातून सदर कामासाठी निधी मिळवून तो प्रश्न मार्गी लावला. महत्वाचे म्हणजे सर्व्हिस रोड आणि संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमीपुजन आमदार सौ. मंंदाताई आणि ग्रामस्थांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. यामुळे सानपाडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा सानपाडा ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला.

सदर भूमीपुजन कार्यक्रमप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत ‘मौजे सानपाडा देवस्थान मंडळ'चे अध्यक्ष सदानंद पाटील, माजी नगरसेवक बाळाराम पाटील, सोमनाथ वास्कर, दिलीप मढवी, महेश मढवी, भार्गव मढवी, रुपेश मढवी, अंबाबाई रघु दळवी, चांगुबाई चिंतामण वास्कर, लक्ष्मी वसंत ठाकूर तसेच सानपाडा ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.

दरम्यान, सानपाडा ग्रामस्थांच्या इतर अडी-अडचणींवर देखील लवकरच मार्ग काढणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ठाणे परिवहन'चा ६९४.५६ कोटींचा अर्थसंकल्प सादर