‘तालुका क्रीडा संकुल'चे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन

ठाणे : क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्‌घाटन सोहळ्यात केले.

ठाणे शहरातील ‘तालुका क्रीडा संकुल'चे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, तहसिलदार युवराज बांगर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडा अधिकारी तथा ‘तालुका क्रीडा संकुल'या सदस्य सचिव सायली जाधव आदि उपस्थित होते.

‘ठाणे'चा पालकमंत्री असल्यापासून मी या ‘संकुल'च्या उभारणीचा साक्षीदार आहे आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्याचे उद्‌घाटनाचे करण्याचे भाग्यही मला मिळाले आहे. मला खात्री आहे या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तालुक्यात, जिल्ह्यात नवनवीन खेळाडुंना आपले कसब दाखविण्याची संधी मिळेल आणि त्यातून चांगले खेळाडू आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करतील. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ठाण्याला खेळ आणि खेळाडू यांच्या विजयाचा मोठा इतिहास आहे. देशात आणि राज्यात नावाजलेले अनेक खेळाडू ठाण्यात आजवर झालेले आहेत. एकेकाळी हनुमान व्यायाम शाळा, आनंद भारती, मावळी मंडळ, आर्य क्रीडा मंडळ या काही निवडक ठिकाणीच फक्त खेळण्याची संधी असे. व्यायाम करणे, स्थानिक स्पर्धांमध्ये पदके मिळवणे या पलिकडे कुणी खेळाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. ती उणीव दादोजी कोंडदेव स्टेडियममुळे भरुन निघाली. तिथे आता ॲथलेटिक्सचे ६ ट्रॅक्स आखले गेले. हायजंप, लाँगजंप, गोळाफेक आदि खेळांना उत्तम व्यासपीठ मिळाले. क्रिकेटची २ उत्तम पिचेस तयार झाली. दरवर्षी ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, कब्बड्डी, खो-खो खेळांच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महापौर चषक स्पर्धा ठाण्यात होतात. मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ठाणे तालुका क्रीडा संकुल त्या या क्रीडा क्षेत्रातले पुढले पाऊल आहे. काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सुविधांसह खेळाडू घडविण्याचे काम इथे होणार आहे. राज्यात खेळ आणि खेळाडुंना पोषक वातावरण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रीय स्तरावरील युवा मेळावा आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली होती आणि ती आपण यशस्वी करुन दाखवली, असेही ते म्हणाले.

आज मोबाईल, इंटरनेटच्या युगात मुले मैदानांपासून दूरावली आहेत, याबाबत चिंता वाटते. मुलांना पुन्हा मैदानी खेळाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. त्यात पालकांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे. सरकारही आपली जबाबदारी झटकणार नाही. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले आहे. कळवा येथे क्रीडा विभागाला जवळपास ४८ एकर जागा दिली आहे. भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये देखील तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण येथील तालुका क्रीडा संकुलांचा मेकओव्हर सुरु आहे. या सर्व क्रीडा संकुलांचा लाभ ठाणे जिल्ह्यामधील सर्व खेळाडूंना होईल, याची मला खात्री आहे. -ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र.

शासनाच्या सन २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्यानुषंगाने ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता क्रीडा विभागाला ९ डिसेंबर २०१३ रोजी शासनाकडून २९८५.२९ चौरस मीटर जागा उपलब्ध करुन देण्यात आली. या क्रीडा संकुलासाठी ४ कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारे सदर संकुल आहे. ठाणे जिल्ह्यातील खेळाडुंना विविध खेळांच्या सरावाकरिता संकुलामध्ये वेटलिपटींग, जिम्नॅस्टिक्स, तायक्वांदो, किकबॉक्सिंग, ज्युडो, करम, बुद्धीबळ, योगा असे इनडोअर गेम्स तसेच एरोबिक्स, अद्ययावत व्यायामशाळा, वैद्यकीय खोली, गेस्ट रुम, स्पर्धा किंवा प्रशिक्षण दरम्यान राहण्यासाठी ३० मुले आणि ३० मुली यांचे वसतिगृह, कॅन्टीन आणि तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय असे उभारण्यात आलेले आहे, अशी माहिती प्रास्ताविकामध्ये जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

दरमयान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता दिक्षीत यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेची पावती फाडण्याच्या बदल्यात मार्केट ओट्याचा ताबा