सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना जानेवारी-२०२४ चा प्रारंभ

नवी मुंबई मेट्रो, सागरी सेतू एमटीएचएल जवळ घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी!

नवी मुंबई  :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळातर्फे ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर २६ जानेवारी २०२४ रोजी महागृहनिर्माण योजना जानेवारी- २०२४ चा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत तळोज्यातील नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोडशी जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू एमटीएचएलच्या सान्निध्यात ३,३२२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २६ जानेवारी २०२४ पासून सुरुवात झाली आहे.

सिडको तर्फे विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याकरिता सातत्याने गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. परवडणाऱ्या दरातील सदनिकांसह दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधांनी परिपूर्ण व नवी मुंबईच्या विकसित नोडमधील गृहसंकुले, या वैशिष्ट्यांमुळे सिडकोच्या आजवरच्या सर्व गृहनिर्माण योजना लोकप्रिय ठरल्या आहेत.

३,३२२ सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील ६१ व तळोजा नोड येथील २५१ याप्रमाणे ३१२ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहेत, तर द्रोणागिरी येथील ३७४ व तळोजा येथील २,६३६ याप्रमाणे ३,०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. योजनेच्या ऑनलाइन नोंदणी व सविस्तर माहितीकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नोंदणी सहाय्यासाठी नागरीकांनी ७०६५४५४४५४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

महागृहनिर्माण योजना जानेवारी - २०२४ करीता अर्ज नोंदणी ते सोडती दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या सुलभ व पारदर्शक ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून २६ जानेवारी २०२४ रोजी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे. योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल २०२४ रोजी काढण्यात येणार आहे.

नवी मुंबई मेट्रोजवळील तळोजा आणि भारतातील सर्वात लांब सी लिंक MTHL ला जोडणाऱ्या द्रोणागिरी नोड येथील सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी २०२४ मध्ये नोंदणी करून घर खरेदी करण्याच्या या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी - २०२४ सादर केली आहे. या योजनेअंतर्गत तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण घटकांतील नागरिकांसाठी ३,३२२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे मी आवाहन करतो. -अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मानखुर्द वाशी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीने टाकला लोखंडी पाईप