‘पनवेल'मध्ये ‘माझी शाळा सुंदर शाळा अभियान'ला सुरुवात

पनवेल : पनवेल महापालिकेच्या १० शाळांमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' राबविण्यास सुरुवात झाली आहे. २ फेब्रुवारी रोजी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' अंतर्गत दहाही शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांची आरोग्य तपासणी आणि विद्यार्थीनींसाठी समुपदेशपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामध्ये यावेळी महापालिका माता-बाल संगोपन वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, प्रशासकीय अधिकारी किर्ती महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापक अनुपमा डांमरे, विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-१चे वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते. तसेच इतर शाळांच्या जवळील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून १० शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक यांची आरोग्य तपासणी आणि समुपदेशनपर व्याख्यान आयोजित  करण्यात आले.

बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेला लठ्ठपणा, मधुमेह आणि डोळयांचे विकार यासारखे आजार तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत विद्यार्थ्यांना माहिती करुन दिली. तसेच किशोरवयीन विद्यार्थिंनीना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत डॉ. रेहाना मुजावर यांनी माहिती दिली. याचबरोबर विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. याचबरोबर हात स्वच्छ धुण्याचे योग्य पध्दतीचे प्रात्यक्षिक देण्यात आले. याच पध्दतीने इतर सर्व शाळेतही वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आजारांची माहिती आणि समुपदेशन करण्यात आले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

उरण - न्हावा शेवा वाहतूक पोलीसांनी विद्यार्थ्यांना दिले वाहतूकीच्या नियमांचे धडे