‘नमो चषक गीत गायन' स्पर्धेला प्रारंभ
पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेला विकास याबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून, त्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो चषक गीत गायन' स्पर्धेचा शुभारंभ २७ जानेवारी रोजी खारघर येथे झाला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने भारत देशाने जगात मोठी झेप घेतली. त्याबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार ‘भारतीय जनता युवा मोर्चा'च्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक' स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यातील एक भाग असलेली गीत गायन स्पर्धा वय १६ ते २५ आणि २५ ते पुढे अशा दोन गटात होत आहे. या स्पर्धेतील पनवेल ग्रामीण आणि खारघर शहर भागाच्या ऑडिशनला २७ जानेवारी रोजी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल येथे सुरुवात झाली. यावेळी आयोजक रवींद्र नाईक, ‘भारतीय जनता युवा मोर्चा'चे खारघर अध्यक्ष नितेश पाटील, पार्श्वगायक तथा परीक्षक गणेश भगत, शास्त्रीय संगीत शिक्षिका परिक्षक वर्षा लोकरे, चंद्रकांत मंजुळे, आदित्य हाणगे, अक्षय लोखंडे, दिनेश यादव आदी उपस्थित होते.
‘नमो चषक गीत गायन' स्पर्धेतील पनवेल शहर, कळंबोली शहर आणि कामोठे शहराची ऑडिशन आज २८ जानेवारी रोजी खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालय मध्ये होणार आहे. तर अंतिम फेरी उद्या २९ जानेवारी रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.