तुर्भे मधील विनापरवानगी बांधकामावर तोडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभाग अंतर्गत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई महापालिका द्वारे करण्यात आली. या कारवाईमुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्या व्यवतींचे धाबे दणाणले आहेत.

तुर्भे सेवटर-२० मधील भूखंड क्रमांक-ए२/३६३ या भूखंडावर विनापरवानगी सुमारे ५.५०मी. बाय ४.२५मी. या मोजमापाचे आरसीसी प्लींथचे बांधकाम सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम,१९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, नोटीसची दखल न घेता सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. सदर अनधिकृत बांधकामावर महापालिका तुर्भे विभाग कार्यालयमार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या खर्चापोटी १५ हजार रुपये इतकी रवकम वसुल करण्यात आली आहे.

तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत रस्ते, पदपथावर विनापरवानगी अनधिकृत स्टॉल उभारण्यात आलेले होते. सदर स्टॉल हटविण्याकरीता नागरिकांकडून वारंवार तक्रार करण्यात येत होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने अतिक्रमण हटाव मोहिमेचे आयोजन करुन तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रातील एकूण ९ अनधिकृत स्टॉल हटविण्यात आलेले आहेत.

याशिवाय रस्त्यावर विनापरवानगी उभी असलेली बेवारस वाहने देखील कारवाई करुन कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आली आहेत. महापालिका द्वारे विनापरवानगी होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यावर नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे.

सदर कारवाई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशान्वये महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी केली आहे.

सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी,  अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते.

तुर्भे सेवटर-२० मधील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता २ इलेक्ट्रीक हॅमर, १ गॅसकटर, १० मजूर यांचा तसेच अनधिकृत स्टॉल हटविण्याकरीता जेसीबी आणि ट्रक यांचा तर बेवारस वाहने हटविण्याकरीता टोईंगव्हॅनचा वापर करण्यात आला.

दरम्यान, नवी मुंबई शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी यापुढे देखील अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेटे यांनी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठा आंदोलनकर्त्यांना एपीएमसी प्रशासनाची साथ