आज नवी मुंबई मध्ये ‘भगवे वादळ'

वाशी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीची तड लावण्याकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरात निघालेला मोर्चा आज २५ जानेवारी रोजी नवी मुंबई मध्ये धडकणार असून, मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम आज २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात होणार आहे. त्यासाठी नवी मुंबई मधील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा तर्फे मोर्चेकऱ्यांची व्यवस्था केली जात आहे.

२० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मधून मुंबई दिशेने निघालेला मराठा समाजाचा मोर्चा आज २५ जानेवारी रोजी पनवेल तालुवयाची वेस ओलांडून नवी मुंबई शहरात दाखल होणार आहे. मोर्चा नवी मुंबई मध्ये मुक्कामी असणार आहे. त्यामुळे या मोर्चात मोठ्या संख्येने सामील झालेल्या मराठा बांधव-भगिनी यांना राहण्यासाठी वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारासह सिडको प्रदर्शन केंद्र आणि नवी मुंबई शहरातील इतर सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या मोर्चात येणाऱ्या कोट्यवधी मराठा बांधवांसाठी नवी मुंबई महापालिकेकडून अपेक्षित मदत मिळत नाही, अशी खंत ‘ नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चा'चे समन्वयक विनोद पोखरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केली.

आज २५ जानेवारी रोजी कोट्यवधींच्या संख्येने मराठा समाज नवी मुंबई शहरात दाखल होणार आहे. या नियोजनाच्या तयारीसाठी ‘मराठा क्रांती मोर्चा, नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय, वॉररुम' तयार करण्यात आला आहे. मराठा आरक्षण दिंडी मोर्चा आज २५ जानेवारी रोजी नवी मुंबईमध्ये मुक्कामी आहे. या दिंडी मोर्चात सहभागी असलेल्या मराठा समाजाच्या सोयीसाठी गाड्या पार्किंग, राहण्याची व्यवस्था, नैसर्गिक विधी आणि इतर सोयींसाठी कांदा-बटाटा बाजार आवारात व्यवस्था करण्यात आली आहे.

आज २५ जानेवारी रोजी वाशी मधील सिडको प्रदर्शन केंद्रात महिलांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच, करावे येथील तांडेल मैदान आणि एपीएमसी मार्केट मध्ये मोर्चेकऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई केमिस्ट आणि ड्रग असोसिएशन तर्फे आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयात ५० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक दोन किमीवर वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहे. तर नवी मुंबईतील महिलांनी प्रत्येकी चार भाकरी देण्याचे ठरले आहे.
------------------------------------
‘मराठा मोर्चा'चा आज नवी मुंबईतील मुक्काम आटोपल्यानंतर मोर्चा मुंबई दिशेने कूच करणार आहे. त्यापूर्वी उद्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाखोंच्या संख्येने तिरंगा फडकविला जाणार आहे

मोर्चेकरांच्या पिण्याच्या पाण्याची, शौचालयांची व्यवस्था करण्याबाबत नवी मुंबई महापालिका, सिडको, पोलीस तसेच एपीएमसी प्रशासन यांच्याशी ‘मराठा क्रांती मोर्चा'च्या शिष्टमंडळाने पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे विनोद पोखरकर यांनी सांगितले.

आज एपीएमसी बाजार आवार  बंद
आज २५ जानेवारी रोजी मराठा मोर्चा नवी मुंबई मध्ये  दाखल होत असून, वाशी मधील एपीएमसी बाजार आवारात मुक्कामी आहे. त्यामुळे होणारी संभाव्य गर्दी पाहता शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना एपीएमसी बाजार आवारात प्रवेश करणे शक्य होणार नाही.त्यामुळे आज २५ जानेवारी रोजी पाचही एपीएमसी बाजार आवार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला असून, कुठलाही शेतमाल खरेदी-विक्री होणार नाही, असे एपीएमसी प्रशासनाने जाहीर केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको महागृहनिर्माण योजना मधील बामणडोंगरी घरांच्या किंमती 6 लाखांनी कमी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश