‘एनएमएमटी'च्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांचे कलागुणदर्शन

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) देशामध्ये तत्पर आणि उत्तम प्रवासी सेवा देणारा उपक्रम म्हणून नावाजला जात असून याचे सारे श्रेय परिवहन व्यवस्थापन तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचे असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, कोणतीही ओळख प्रदर्शित न करता ‘एनएमएमटी' बसने स्वतः प्रवास करुन आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्याचे सांगत उत्तम सेवा आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देणाऱ्या अधिकारी-कर्मचारीवृंदाचे आयुक्त नार्वेकर यांनी कौतुक केले. आपल्यासमोर शेजारील शहरांच्या परिवहन सेवांचे मोठे आव्हान असूनही या स्पर्धेमध्ये आपण त्यांच्यापेक्षा अधिक चांगली सेवा देऊन सरस ठरु , असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचा २८ वा वर्धापन दिन २३ जानेवारी रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झाला. या सोहळ्यात आयुवत राजेश नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एनएमएमटी असा ‘एनएमएमसी'चा छोटा भाऊ असून हा कर्तृत्ववान भाऊ लवकरच आपली कर्तबगारी सिध्द करेल, अशा शब्दात आपल्या भावना मांडल्या.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर, उपायुक्त मंगला माळवे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा-वित्त अधिकारी तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता विवेक अचलकर, मुख्य वाहतूक अधीक्षक उमाकांत जंगले, वाहतूक अधीक्षक सुनिल साळुंखे, तुर्भे डेपो मॅनेजर सुनिल जगताप, प्रशासन अधिकारी दिपीका पाटील, लेखा अधिकारी प्रशांत सपकाळ, आदि उपस्थित होते.

प्रवासीभिमुख सेवा देताना प्रवाशांच्या हिताचीही काळजी ‘एनएमएमटी'मार्फत घेतली जात असून विद्यार्थी बस पास योजना तसेच ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत असे दोन ऐतिहासिक निर्णय ‘परिवहन उपक्रम'ची सामाजिक बांधिलकी दर्शविणारे असून दर्जेदार सेवेची परंपरा अशीच कायम राखावी, असे आवाहन आयुवत नार्वेकर यांनी यावेळी केले.

परिवहन व्यवस्थापक योगश कडुसकर यांनी समाधानकारक प्रवासी सेवा पुरविताना त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि काळाची पावले ओळखून पर्यावरणपूरक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. कोणतीही परिवहन सेवा तोट्यात चालते; मात्र सदर तोटा कमीत कमी करण्यासाठी प्रतिदिन दिड किलोमीटर कमी करणे, शनिवार आणि रविवारी प्राधान्याने इलेक्ट्रिक बसेसचा वापर करुन इंधन खर्च कमी करणे अशा विविध उपाययोजनांद्वारे ‘एनएमएमटी'मार्फत विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगत योगेश कडुसकर यांनी परिवहन उपक्रमातील अधिकारी-कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग, त्याच्या फरकाची रक्कम, मेडीक्लेम अशा विविध सुविधांचे योग्य लाभ मिळतील याकडे बारकाईने लक्ष असल्याबद्दल उपक्रमाच्या वतीने आयुवतांचे आभार मानले.

दरम्यान, ‘वर्धापन दिन'चे औचित्य साधून शंकर काकुळते (चालक, डी-६१५) आणि गजानन सपकाळ (चालक, डी.६१३) या दोन यांना गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे १० वी, १२ वी आणि पदवी तसेच उच्च परीक्षांमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या परिवहन अधिकारी, कर्मचारी यांच्या पाल्यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वर्धापन दिन निमित्त घेण्यात आलेल्या सांघिक स्पर्धा तसेच व्यक्तिगत स्पर्धांमधील विजेत्यांना गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळाही यावेळी संपन्न झाला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुुंबईमध्ये मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरु