मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
आयुवतांचा अनधिकृत बांधकामावर हातोडा अन् दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून बांधकामांना अभय
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत विविध प्रभाग समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि इमारतींचे काम सुरु होते. याबाबत प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना अनेक तक्रारी प्राप्त होऊन देखील अनधिकृत बांधकामांवर कुठलीच कारवाई न झाल्याने प्रकरण थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात पोहोचले. तत्पूर्वी अनेकवेळा बैठकीत सहाय्यक आयुक्तांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुवतांमार्फत दिले गेले होते. तसेच अनधिकृत बांधकामांबाबत सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशाराही आयुवतांनी दिला होता. मात्र, तरीही महापालिका हद्दीत बांधकामाचे सत्र सुरुच राहिले. अखेर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणी धडक कारवाई सुरु करुन अनेक बांधकामे मुळापासून उध्वस्त केली. पण, अधिकाऱ्यांनी काही बांधकामे लपविल्याने ती शाबूत राहिल्याने अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु असतानाही त्या बांधकामांबाबत तक्रारदारांमध्ये असंतोष पसरला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने दिवा, कळवा परिसरातील अनेक अनधिकत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. कळवा, दिवा, परिसरातील अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत. मात्र, ज्या इमारती पूर्ण झालेल्या आहेत अशा अनधिकृत इमारतींची माहिती अधिकारी वर्गाने महापालिका आयुवतांपासून जाणीवपूर्वक लपवून भूमाफिया आणि बांधकामांना अभय दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तथा माहितीचा अधिकार कार्यकर्त्या प्रियांका शाद यांनी केला आहे. त्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्यानंतरही कारवाईच झालेली नसल्याचा आरोपही केला आहे. तर ‘वंचित बहुजन आघडी'च्या ठाणे पदाधिकाऱ्यांनी तर तक्रारी घेऊन इकडून तिकडे जा, अशी दिशाभूल होत असल्याचे सांगितले.
कळवा, माजिवडा-मानपाडा, दिवा या ठिकाणी अनेक अनधिकृत इमारती उभ्या आहेत. हॉटेलवर माळे चढवून अनधिकृत बांधकामांचा धंदा सुरु आहे. अधिकारी संरक्षण देत आहेत. तक्रारी आयुक्तांपर्यंत पोहाचतात की नाही; पण भूमाफिया बिल्डरचे बांधकाम सुरुच राहते. तक्रारदारांना कारवाई होणार असल्याचे आश्वासन देऊन पळविले जाते.
-प्रियांका शाद (सामाजिक कार्यकर्त्या-माहिती अधिकार कार्यकर्त्या.
लोकमान्य सावरकर प्रभाग समितीत जाधव नावाच्या बिल्डरने ७ माळ्याची इमारत उभी केली. अनेक तक्रारी केल्या. प्रभाग समिती, अतिक्रमण विभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त फिरवाफिरवी करतात. कारवाई करीत नाही. आता याबाबत उपोषण करुन तक्रारी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याशिवाय कारवाई होणार नाही. - योगिता गजभिये, पदाधिकारी-वंचित बहुजन आघाडी, ठाणे.
तक्रारी केलेली आणि कारवाई न झालेली बांधकामे...
लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती-मनपसंद स्वीट कॉर्नरजवळ ५ माळ्याची अनधिकृत इमारत.
लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती-शिवाजीवाडी, सावरकरनगर, ७ माळ्याची इमारत.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती-गोयंका इंटरनेशनल स्कुल समोर, ठाणे-भिवंडी रोडवर हॉटेल स्पेसर हॉटेल मालकाकडून अनधिकृत माळे चढवून लॉजिंग-बार सुरु.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती-शासनाच्या भूखंडावर बाळकूम पाडा नं.३ मध्ये लोढा कासा रॉयलच्या रस्त्याच्या लगत अनधिकृत बांधकाम.