जुहूगांव मध्ये आज ग्रामदेवता ‘मरिआई देवी'ची जत्रा

वाशी : चैत्र महिना सुरु होताच सर्व गावात ग्रामदेवतेच्या जत्रांना सुरुवात होते. नवी मुंबई शहरातील  जुहूगांव मधील जत्रा पासून नवी मुंबई मधील जत्रांना सुरुवात होते. चैत्र शुध्द सप्तमी दिनी जुहूगांव मध्ये ग्रामदेवता ‘मरिआई' देवीची जत्रा भरत असून, जत्रेच्या एक दिवस अगोदर देवीची पालखी आणि जागरण होते. या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

जुहूगांव मधील ग्रामदेवता मरिआई माऊलीची जत्रा दरवर्षी चैत्र शुध्द सप्तमी दिनी भरत असून, यंदा आज १४ एप्रिल रोजी मरिआई माऊलीची जत्रा भरणार आहे. मरिआई देवीचा जागरण सोहळा चैत्र शुध्द षष्टी दिनी होत असून, १३ एप्रिल रोजी मरिआई देवीचा जागरण सोहळा पार पडला. यावेळी मरिआई देवी मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी करण्यात आले. या सोहळ्यात येळकोट काठी काढली जाते. देवीला नवसाचे नैवेद्य दिले जातात. तसेच  रात्री बायांची गाणी गायली जातात. त्याआधी जुहूगांव मध्ये मरिआई मातेची पालखी मिरवणूक काढली जाते. या पालखी मिरवणुकीत पारंपरिक पध्दतीने वेशभूषा परिधान करुन जुहूगावातील लहानग्यांपासून सर्व ग्रामस्थांचा सहभाग असतो.

मरिआई देवीची महती...
जुहूगांव वेशीवर पूर्व दिशेला मरिआई देवीचे मंदिर आहे.पूर्वी चोहोबाजूनी पाण्याने या देवळाला वेढले होते. एका छोट्याच्या बेटावर मरिआई प्रकट झाली. मरिआई देवी दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वीपासून या ठिकाणी आहे, असे जुहूगांवातील ग्रामस्थ नागेश पाटील यांनी सांगितले.

पूर्वी या ठिकाणी मरिआई देवीची पाषाणरुपी शिळा होती. सुमारे ७५ ते  ८०  वर्षांपूर्वी या शिळेतून मूर्ती घडवली. सुमारे २९ वर्षापूर्वी लोकसहभागातून मरिआई मंदिराचे अध्यक्ष रमण भोईर यांनी जुहूगांव मधील मरिआई देवी मंदिराचा जीर्णोध्दार केला. आज ग्रामस्थांबरोबर संपूर्ण नवी मुंबईतील नागरिक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आगरी-कोळी समाजाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तसेच उतर भारतीय नागरिकांची देखील या देवीवर अपार श्रध्दा आहे. याच श्रध्देतून मरिआई देवीला लाखो भक्त नवस बोलत असतात. त्यानंतर नवस फेडण्यासाठी लोक मरिआई देवीच्या दर्शनासाठी येतात.पूर्वी गावातील भोपी देवीची पूजाअर्चा करत होते. कारण ब्राम्हण मरिआई देवीची पूजा निषिध्द मानीत असत. परंतु, आता वाढत्या भविकांच्या गर्दीमुळे मंदिरात ब्राम्हण पुजारी असतात. मरिआई देवीची मूर्ती फार सुंदर आहे. मरिआई देवीच्या जोडीने नागोबा आणि शिदोबा या दोन देवता आहेत. या दोन देवता मरिआई देवीचे भाऊ आहेत असे मानले जाते. पूर्वी या देवता शिळा रुपात होत्या. परंतु, ग्रामस्थांच्या आग्रहाने या देवता मूर्ती स्वरुपात घडविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पूर्वीच्या शिळा मूर्ती देखील पूजेत आहेत. मरिआई देवीची स्वतंत्र अशी आरती असून, या आरतीची रचना जुहूगांव मधील कवी तथा ज्येष्ठ पत्रकार अरविंद पाटील यांनी केली आहे.

जत्रा निमित्त लाखोंची उलाढाल
जत्रा म्हटल्यावर भाविकांची गर्दी होणे स्वाभाविक आहे. जत्रेला गेल्यावर खरेदी केली नाही, असे क्वचितच कुणाच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे एखाद्या गावात जत्रा असली की मिष्ठान्न पासून खेळणी, विविध वस्तूंची दुकाने आणि आकाश पाळणी हमखास असतात. जुहूगांव मध्ये देखील जत्रा निमित्त गावाचे प्रवेश द्वार ते नवी मुंबई महापालिका शाळा या मुख्य रस्त्यावर बाजार भरतो. या बाजारात शेकडो व्यावसायिक दुकाने थाटत असून, या जत्रेत आकाश पाळणे देखील असतात.त्यामुळे जत्रेनिमित्त एक दिवसीय बाजारातून लाखोंची उलाढाल होत असते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मावळ लोकसभा मतदारसंघात खा. श्रीरंग बारणे विरुध्द संजोग वाघेरे