मावळ लोकसभा मतदारसंघात खा. श्रीरंग बारणे विरुध्द संजोग वाघेरे

खारघर : लोकसभा निवडणुकीत  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्ष महायुती विरुध्द शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ‘महायुती'चे उमेदवार श्रीरंग बारणे विरुध्द  ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार संजोग वाघेरे या दोघांमध्ये खरी लढत होणार आहे. विशेष म्हणजे खारघर मध्ये ‘भाजप'चे वर्चस्व असून, खारघर मधील मतदारसंख्या सव्वा लाखाच्या घरात  आहे. त्यामुळे ‘भाजप'चे वर्चस्व मोडीत काढून  खारघर मधून ‘महाविकास आघाडी'च्या उमदेवाराला मतांची आघाडी मिळवून देण्यासाठी  ‘महाविकास आघाडी'च्या कार्यकर्त्यांची खरी कसोटी लागणार आहे.

खारघर शहर पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वात मोठा नोड असून, खारघर मध्ये जवळपास सव्वा लाख मतदार आहेत. ग्रामपंचायत काळात खारघर आणि ओवे गट ग्रामपंचायत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांचे वर्चस्व होते. दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भाजप मध्ये सामील झाले. तर पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना पक्षाला भोपळा फोडता आला नाही. मात्र, गेल्या पाच वर्षात शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी विभागनिहाय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करुन पक्ष वाढीसाठी जोर दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) या पक्षांच्या ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार संजोग वाघेरे निवडणूक लढवित आहेत. विशेष म्हणजे शिवसेना (उबाठा) पक्षाचे  निवडणूक चिन्ह ‘मशाल' असून, या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांचे निवडणूक चिन्ह ‘मशाल' मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘महाविकास आघाडी'च्या कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  खारघर वसाहत मध्ये सुशिक्षित मतदार आहेत. मात्र, खारघर परिसरातील गावे, आदिवासी पाडे मधील तसेच भाड्याने वास्तव्य करणाऱ्या मतदारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. या मतदारांचा  शोध घेवून त्यांच्यापर्यंत उमेदवाराचे निवडणूक चिन्ह पोहोचविणे आवश्यक आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी एक महिन्यापेक्षा कमी कालावधी असून, जवळपास २३ दिवसात संजोग वाघेरे यांना आघाडी मिळवून देण्यासाठी ‘महाविकास आघाडी'च्या कार्यकर्त्यांची दमछाक होणार आहे.

‘महाविकास आघाडी'च्या बैठकीत प्रचार सभा, रॅली आदी विषयांवर चर्चा करुन मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. - विश्वनाथ चौधरी, अध्यक्ष- खारघर शहर काँग्रेस.

‘महाविकास आघाडी'च्या काही बैठका पार पडल्या असून, ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचार सुरु केला आहे.-  राजश्री कदम, महिला अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), रायगड जिल्हा.

खारघर शहर पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा नोड आहे. विशेष म्हणजे ‘महायुती'च्या खासदारांनी गेल्या १० वर्षात कोणतीही विकास कामे केली नाहीत. मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांनी न केलेली विकासकामे याची माहिती मतदारांना देऊन ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवारांना खारघर मधून मतांची आघाडी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - गुरुनाथ पाटील, खारघर शहरप्रमुख - शिवसेना (उबाठा). 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जांभळी नाका येथील चैत्री नवरात्रौत्सव भक्ती व कलामहोत्सवात ‘नवरत्न व नवदुर्गा' पुरस्कारांचे वितरण