देशाच्या विकासामध्ये ‘सीएं'चे योगदान महत्त्वाचे

कल्याण : गेल्या १० वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वन नेशन वन टॅक्स प्रणालीमुळे आज ‘जीएसटी'चे संकलन २ लाख कोटींपर्यंत पोहोचले असून देशाच्या विकासामध्ये चार्टर्ड अकाऊंटन्टचे योगदानही महत्त्वाचे असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्टस्‌ या संस्थेच्या कल्याण-डोंबिवली शाखेला आयसीए भवन बांधण्यासाठी ‘केडीएमसी'कडून भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानिमित्त कल्याण येथे आयोजित सोहळ्याला ना. रविंद्र चव्हाण आणि खा. डॉ.शिंदे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार विकासाच्या बाबतीत केवळ फास्ट नाही, तर सुपरफास्ट आहे. गेल्या १० वर्षांच्या काळात देशामध्ये आमुलाग्र बदल झाले असून देशाप्रमाणे ‘सीए' यांचेही अच्छे दिन आल्याचे ना. रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर आपली भूमिका बजावत असतात. अगदी त्याचपध्दतीने देशाचे आर्थिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सीए वर्ग प्रयत्नशील असतात. देशाच्या आर्थिक विकासामध्ये आणि ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्यात ‘सीएं'चेही मोठे योगदान असेल, असा विश्वास खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

कल्याण-डोंबिवली शाखाचे दिवा- भिवंडीसह थेट कर्जत-कसारा पर्यंतच्या भागातील तब्बल ५ हजारांहुन अधिक चार्टर्ड अकाऊंटन्ट सदस्य आणि १५ हजारांहुन अधिक विद्यार्थी सलग्न आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका कडून कल्याण पश्चिम मधील चिकणघर परिसरात तब्बल १७ गुंठे क्षेत्रफळाचा भूखंड चार्टर्ड अकाऊंटन्टस्‌च्या कल्याण-डोंबिवली शाखेला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्यामध्ये सुसज्ज असे ऑडीटोरियम, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, कॉम्प्युटर कक्षासह क्लासरुम, ट्रेनिंग सेंटरचा समावेश असेल, अशी माहिती समिती सदस्य सीए कौशिक गडा यांनी दिली.

सदर सोहळ्याला ‘कल्याण'चे माजी आमदार नरेंद्र पवार, ‘केडीएमसी'चे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, ‘सीए संघटना'चे सेंट्रल कौन्सिल मेंबर मंगेश किनरे, प्रिती सावला, राजकुमार अडुकिया, पियुष छाजेड यांच्यासह कल्याण डोंबिवली ब्रँचचे अध्यक्ष मयुर जैन, उपाध्यक्ष राकेश अग्रवाल, सचिव अमित मोहरे, खजिनदार विकास कामरा, गिरीश तारवानी, पराग प्रभुदेसाई, सुहास आंबेकर, प्रदीप मेहता, कौशिक गडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आवक मध्ये वाढ; एपीएमसी धान्य बाजारात ज्वारी दरात घसरण