उल्हासनगर मधील रस्त्याची दुरवस्था

उल्हासनगर: मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी उल्हासनगर महापालिका द्वारे सिमेंट काँक्रीटचे चांगले रस्ते खोदून ठेवल्याने या रस्त्यावरुन मार्ग काढताना वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर कॅम्प-४ मधील सुभाष टेकडी परिसरातील रस्ता महापालिका द्वारे मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आला आहे. मात्र, रस्ता खोदकामानंतर बराच कालावधी उलटून गेला असून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यापूर्वी ऐन रस्त्याच्या मधोमध दगडधोंडे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन चालण्यासाठी पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, वाहने पंक्चर होत आहेत.

उल्हासनगर मधील शेखर भालेराव चौकात महापालिका तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरु असून, या पुतळ्याचे काम उद्या १४ एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पूर्वी पूर्णत्वास येईल की नाही?, याबाबत भीम अनुयायांकडून शंका उपस्थित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर मधील सुहास म्हस्के या तरुणाने  दहाचाळ पर्यंत ड्रेनेज टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.‘ब्लडप्रेशर, शुगर, गुडघ्याला व्यायाम, वजन कमी करण्यासाठी महापालिकेकडून बनवण्यात येत असलेल्या या रस्ताचा आवश्य लाभ घ्यावा, सकाळी-संध्याकाळी या रस्त्यावर चालावे', अशी बोचरी टिका या पोस्टमध्ये करण्यात आली आहे.

दरवर्षी १४ एप्रिल या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सदर रस्त्यावरून भीम अनुयायी वाजतगाजत चौकात जातात. यावेळेस दगडधोंड्याच्या रस्त्यामुळे भीम अनुयायांच्या आनंदावर विरजण पडणार काय?, असा प्रश्न आता भीम अनुयायींकडून उपस्थित होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चैत्र नवरात्रोत्सव मध्ये वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान