‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे यंदा नवरात्र उत्सवात राम मंदिराचा देखावा

ठाणे : चैत्र महिना सुरु झाल्यानंतर नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात, ते चैत्र नवरात्रोत्सवाचे. दरवर्षी ठाणे मधील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवास लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. ठाणे मधील या चैत्र नवरात्रोत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील यंदाचे १७ वे वर्ष आहे. यापूर्वी चरई येथे १२ वर्ष अशी एकूण २९ वर्ष चैत्र नवरात्रोत्सव साजरा करीत आहोत.

या चैत्र नवरात्रोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत असते. त्यानुसार यंदा ९ एप्रिल ते रामनवमी १७ एप्रिल २०२४ पर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येणार आहेत. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी या देवीची ख्याती आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी देवी जगभरात प्रसिध्द आहे. त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात.

‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'च्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सुप्रसिध्द प्रधानाचार्य आणि यज्ञाचार्य वे. शा. सं. मुकुंदशास्त्री मुळे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून यंदा ठाणेकरांना अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडविले जाणार आहे. या मंदिराची उंची ७० फूट असणार आहे. देवीचा सभा मंडप २४ बाय २४ फुटाचा असणार आहे. त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा १६ बाय १६ फुटाचा असणार आहे.

४०बाय ४०‘नऊ' हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग असणार आहे. या हवनकुंडाला १०८ परिक्रमा पूर्ण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. या सर्व ठिकाणी भक्तांच्या सोयीचे सुध्दा भान ठेवण्यात आले आहे. त्या व्यतिरिवत मुख्य मंदिरा भोवतालचा संपूर्ण भाग प्रतिष्ठीत व्यक्तींसाठी बनविलेला कक्ष, करमणुकीचा रंगमंच, संपूर्ण तलावपाळी परिसराला विद्युत रोषणाई करुन लेझर शो करण्यात येणार आहे. तसेच चौकात दाक्षिणात्य शैलीचा वापर करुन सुशोभिकरण करण्यात आले आहे.

शंभरहून अधिक कारागीर घेऊन अहोरात्र काम करीत आहेत. फायबर, प्लायवुड, कपडा, रंग, ई-वस्तुंचा वापर करुन सदरची सुंदर कलाकृती साकारण्यात येत आहे. नरेंद्र बेडेकर आणि सौ. अश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यात आली आहे.  

दरम्यान, चैत्र नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसात रोज सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३ ते सायं. ५.३०  या कालावधीत नऊ कुंडांवर होम हवन केले जाईल. तसेच सायंकाळी ५.३० ते ६ वाजता देवीची आरती होईल. १७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० पर्यंत पुर्णाहूती विधी संपन्न होणार आहे. या नऊ दिवसात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रोज होणाऱ्या सहस्त्रचण्डी महायागास आणि सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ नंतर छत्रपती शिवाजी मैदान, रंगो बापूजी गुप्ते चौक, तलाव पाली, जांभळी नाका, ठाणे येथे होणार आहेत. देवीभवतांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांचे लाभ घेण्याचे आवाहन ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने करण्यात आले आहे.      

आज देवीचे आगमन...

आज ९ एप्रिल २०२४ रोजी देवीचे आगमन कळवा येथून सकाळी १० वाजता वाजत गाजत होणार आहे. यासाठी ३०० जणांचे लेझीम पथक जय्यत तयारीत आहे. तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी सांप्रदायाचे वारकरी पथके, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे आणि पुरुषांचे  लेझीमपथक, घोडेस्वार, मावळे अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बचत गटातील महिला निर्मित रेडिमेड गुढी, तोरण, मॅटवरील  रांगोळी यांना अधिक मागणी