बचत गटातील महिला निर्मित रेडिमेड गुढी, तोरण, मॅटवरील  रांगोळी यांना अधिक मागणी

खारघर : गुढीपाडवा निमित्त नवी मुंबई मधील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या रेडिमेड गुढी, तोरण आणि मॅटवर नावीन्यपूर्ण पध्दतीने काढलेल्या रांगोळी यांना नवी मुंबई, पनवेल परिसरात अधिक मागणी आहे. दुसरीकडे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडवा दिवसाने होते. नवीन हिंदू, मराठी वर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात येतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी, त्यावर गडू तांब्या, कडूनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, साखरेची गाठी आणि फुलांचा हार गुढीला चढवून घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पती-पत्नी दोघेही नोकरी, व्यवसायात व्यस्त  असल्यामुळे तसेच  गुढी उभारण्यासाठी कडू निंबाचे डहाळे, आंब्याची पाने मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने नागरिकांचा कल रेडीमेड गुढी खरेदी करण्याकडे वळला आहे. याची दखल घेऊन नेरुळ येथील राजनंदिनी महिला बचत गटातील महिला सदस्यांनी साडीची गुढी, दारावर सुंदर तोरण आणि दारासमोर मॅटवर सुंदर नक्षीदार रांगोळी  तयार करुन त्यांची विक्री सुरु केली आहे.

नवी मुंबई, पनवेल आणि खारघर परिसरातील बाजारपेठेत प्लास्टिक वाटीमध्ये मेण टाकून छोट्या काठीवर सोवळ्याचे वस्त्र, साखरगाठीचा कृत्रिम कलात्मक हार, तांब्या, कडुनिंबाची कृत्रिम पाने आदींचा वापर करुन तयार केलेली छोटीशी गुढी नागरिकांचे विशेषतः महिलांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या पलॅट संस्कृतीमध्ये गुढीसाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे घरातील देव्हारा, वाहन तसेच कार्यालयात ठेवता येतील, अशा छोट्या रेडिमेड गुढ्यांना चांगली पसंती मिळते आहे.

  भारत बाहेरील देशात मराठी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, त्यांच्याकडून मराठी साहित्य उत्सव, श्रीगणेश उत्सव यांसह विविध उत्सव साजरे करण्यात येतात. गुढीपाढवा सणासाठी ऐरोली येथील महिला बचत गटातील सदस्या मंदा कोंडविलकर या त्यांनी तयार केलेल्या कापडी तोरण, गुढी, विडा आणि सुपारी अशा ‘कॉम्बो पॅक'ची विक्री करीत असून, स्वीडन, अमेरिका, दुबई तसेच गोवा मध्ये डाकद्वारे त्यांनी ‘रेडिमेड गुढी'ची ऑर्डर  पूर्ण केली आहे.

धावपळीचे जीवन, त्यात पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असल्यामुळे बहुतांशी नागरिक ‘रेडिमेड गुढी'ची खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे  राजनंदिनी महिला बचत गटातील दहा सदस्यांनी  एकत्र येवून तोरण, मॅट वरील रांगोळी आणि साडीची सुंदर गुढी तयार करुन कार्यालय तसेच सोशल मीडिया द्वारे विक्री केली आहे. महिला बचत गट निर्मित तोरण, मॅट वरील रांगोळी आणि साडीची सुंदर गुढी विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. - उज्वला घाडगे, सदस्य - राजनंदिनी महिला बचत गट, नेरुळ.

शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला गुढीपाडवा दिनी गुढी उभारण्यासाठी साहित्य मिळत नाही. त्यामुळे  रेडिमेड गुढी घेवून पूजा केली जाते. त्यामुळे काही होतकरु बचत गटातील महिला चांगल्या प्रकारे गुढी तयार करुन त्यांची विक्री करीत आहेत. - प्रियांका पाटील, कर्मचारी-शिरवणे, नवी मुंबई.

गुढीपाडवा सणासाठी हिंदू समाजात गुढीला अधिक मागणी असते. त्यामुळे बाजारात गुढीला मागणी वाढली आहे. दुकानात दीडशे ते एक हजार रुपये पर्यंत गुढी उपलब्ध आहे. - नारायण प्रजापती, दुकानदार - खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गुढीपाडवा मुहूर्तावर ९५ हजार पेट्या हापूस आंबा आवक