२ दशकांतच तुर्भे उड्डाणपुल पाडण्याची वेळ
नवी मुंबई : ब्रिटीशांनी बांधलेले उड्डाणपुल भारतीय हवामानात १०० वर्षाहुन अधिक काळ टिकत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘सिडको'ने सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथे बांधलेला उड्डाणपुल अवघ्या २४ वर्षामध्ये वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. निकृष्ठ बांधकामामुळेच सदर उड्डाणपुल धोकादायक झाल्याने तो पाडण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडको यांचा बांधकाम दर्जा आणि पर्यायाने प्रशासनाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तुर्भे येथील उड्डाणपुलाच्या निकृष्ठ बांधकामाला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ‘सजग नागरिक मंच'ने केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान अस्तित्वात नसताना स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले ब्रिटीशकालीन पुल १०० वर्षापेक्षा अधिक वर्षे टिकल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘सिडको'ने १९९७-९८ मध्ये सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथे संयुवतपणे बांधलेला उड्डाणपुल अवघ्या २४ वर्षामध्ये पाडण्यास सुरुवात केली आहे. सिमेंटच्या उड्डाणपुलाचे आयुर्मान १०० वर्षे गृहीत धरले जात असताना तुर्भे उड्डाणपुल केवळ २४ वर्षाच्या कालावधीतच धोकादायक झाल्याने तो पाडण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. त्यामुळे पीडब्ल्युडी आणि ‘सिडको'चा बांधकाम दर्जा म्हणजे पर्यायाने प्रशासनाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. मात्र, आता सरकारी यंत्रणेच्या मदतीला आधुनिक तंत्रज्ञान देखील आहे. त्यामुळे भारतीयांनी भारतीयांसाठी बांधलेले उड्डाणपुल १०० वर्षे का टिकत नाहीत? जर कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेला उड्डाणपुल अडीच दशकाच्या काळातच पाडण्याची वेळ येत असेल तर त्यास जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. तसेच या उड्डाणपुलाच्या निकृष्ठ बांधकामाला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का? असा प्रश्न ‘सजग नागरिक मंच'ने उपस्थित केला आहे.
सर्वसाधारणपणे पाश्चात्य देशात सिमेंटच्या पुलांचे आयुर्मान सरासरी १०० वर्षाचे गृहीत धरलेले असते. प्रामाणिकपणे उत्तम प्रतीचे पुल बांधल्यास ते १०० वर्षे भारतात देखील टिकतात याची प्रचिती देणारे अनेक ब्रिटीशकालीन पुल आजही अस्तित्वात आहेत. या पुलांचे १०० वर्षाचे आयुर्मान पुर्ण झाल्याचे गृहीत धरुन ते पाडले जात आहेत.
सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथे सन १९९७-९८ मध्ये बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन ‘महाराष्ट्र'चे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. पण, कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ठ करण्यात आल्याने या उड्डाणपुलाच्या देखभाल-दुरुस्तीवर आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च खर्च करण्यात आला आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे येथील उड्डाणपुल अवघ्या २४ वर्षात पाडण्याची वेळ का आली? सबंधित अधिकाऱ्यांनी पुलाच्या निकृष्ठ बांधकामाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने पुल पाडण्याची वेळ आली का? या पुलाच्या निकृष्ठ दर्जाबाबत सिडको-पीडब्ल्यूडी मधील अभियंते अधिकारी यांचे उत्तरदायित्व कोण फिक्स करणार? याबाबत खुलासा करावा. - सुधीर दाणी, प्रवर्तक-सजग नागरिक मंच, नवी मुंबई.