वाशीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

नवी मुंबई : वाशी, सेक्टर-२९ मधील भूखंड क्र.४९वर असलेल्या सुदामा सोसायटीमध्ये स्लॅब कोसळल्याची दुर्घटना ५ एप्रिल रोजी घडली आहे. सुदामा सोसायटीत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरु असताना या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला. सुर्देवाने सदर दुर्घटनेवेळी कूणीही जखमी न झाल्याने जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, २३ ऑगस्ट २०२३ रोजी नेरुळ, सेवटर-६ सारसोळे येथील तुलसी भवन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅबर खालच्या मजल्यावर कोसळल्याची घटना घडून या दुर्घटनेत २ जण ठार तर ४ जण जखमी झाले होते. तर ११ जून २०२२ रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास नेरुळ, सेवटर-१७ मधील जिमी पार्क या सहा मजली इमारतीच्या ए-विंग मधील सहाव्या मजल्यावरील हॉलचा स्लॅब एकावर एक असे तळमजल्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळून या दुर्घटनेत २९ वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू तर ७ जण जखमी झाले होते. यानंतर आता वाशीमध्ये स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.

 वाशी, सेवटर-२९ मधील सुदामा सोसायटीमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरामध्ये ५ एप्रिल रोजी लादी बसवण्याचे काम सुरु होते. याचवेळी सायंकाळी ४ च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील कमकूवत झालेला स्लॅब खाली पहिल्या महिल्यावर कोसळल्याने दोन्ही मजले जमीनदोस्त झाले. सुर्दर्वाने स्लॅब ज्या हॉलच्या ठिकाणी पडला, त्यावेळी खालच्या घरात कोणीही हजर नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन सुत्रांनी सांगितले. घटनास्थळी महापालिका अधिकारी, अग्निशमन अधिकारी तसेच इतर संबंधित यंत्रणांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, ३ महिन्यापूर्वी सुदामा सोसायटीतील सदर इमारतीचे संरचना परीक्षण करण्यात आले असून इमारत सुस्थितीत असल्याचा परीक्षण अहवाल प्राप्त झालेला आहे. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव सदर इमारत रिकामी करण्यात आली असून येथील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था राजस्थान हॉल मध्ये करण्यात आली आहे. या इमारतीचे पुन्हा परीक्षण केल्यानंतर  रहिवाशांना इमारतीत राहण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रबाळे एमआयडीसी भागातील सर्व्हिस रोड गायब