नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी
‘अटल सेतू'वर ‘मॅरेथॉन'चे आयोजन
नवी मुंबई : ‘शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू'वर (एमटीएचएल) ‘एमएमआरडीए'कडून उद्या १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर आज १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसेच ‘अटल सेतू'न ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गावरुन जाण्याबाबत सूचित केले आहे.
‘एमएमआरडीए'कडून ‘अटल सेतू शिवडी-न्हावा शेवा सी लिंक'वर १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ते दुपारी १२ या कालावधीत होणाऱ्या ‘मॅरेथॉन'ला कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये तसेच मॅरेथॉन कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा, यासाठी ‘अटल सेतू'वर १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. तसेच अटल सेतू बंद असलेल्या कालावधीत उरणकडून अटल सेतू वरुन जाणाऱ्या वाहनांना गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशी मार्गे पुढे इच्छीत स्थळी जाण्यासाठी पर्याही मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पुण्याहून अटल सेतू मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने बेलापूर, वाशी मार्ग पुढे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच जुना मुंबई-पुणे हायवे, कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेलकडून येणाऱ्या वाहनांना देखील गव्हाणफाटा, उरणफाटा, वाशीमार्गे पुढे इच्छित जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटी कडून मुंबईसाठी जाणाऱ्या हलक्या वाहनांना गव्हाण फाटा मार्गे उलवे आम्र मार्गे वाशी खाडीपुल मार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या वाहतूक नियंत्रण अधिसुचनेतून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील तसेच मॅरेथॉन मधील वाहनांना वगळण्यात आले आहे.