नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी
शशांक वाकडे ‘नवी मुंबई महापालिका राज्यस्तरीय श्री'
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करुन नवी मुंबईतील खेळाडू आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असते. यामधील एक महत्त्वाचा उपक्रम ‘नवी मुंबई महानगरपालिका श्री' राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा असून १९९६ सालापासून सातत्याने आयोजित केला जात आहे. या माध्यमातून नवी मुंबईतील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटुंना आपले क्रीडा प्रदर्शन करण्याची संधी मिळावी या दृष्टीने राज्यस्तरीय स्पर्धेप्रमाणेच ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा देखील आयोजित करण्यात येते.
अशाच प्रकारची यावर्षीची स्पर्धा विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये राज्यभरातील तसेच नवी मुंबईतील २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटुंनी पूर्ण क्षमतेने सहभागी होत यशस्वी केली.
‘नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा'मध्ये पुणे जिल्ह्याच्या शशांक वाकडे या शरीरसौष्ठवपटुने राज्यस्तरीय श्री बहुमान पटकावला. सोलापूर जिल्ह्याचे शरीरसौष्ठवपटू पंचाक्षरी लोणार यांनी उपविजेतेपद संपादन केले. मुंबई जिल्ह्याचे निलेश दगडे यांनी ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर' किताब तसेच पालघर जिल्हयाच्या लकपा लामा यांनी ‘बेस्ट पोझर' किताब मिळविला. ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो, ८५ किलो आणि ८५ किलोवरील अशा ८ वजनी गटातील प्रत्येकी सहा विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
त्याचप्रमाणे ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा'मध्ये सुरेंद्र डंगवाल यांनी प्रथम क्रमांकाचा चषक संपादन केला. शरीरसौष्ठवपटू प्रशांत गुरव यांनी उपविजेतेपद पटकाविले. ५० किलो, ५५ किलो, ६0 किलो, ६५ किलो, ७०किलो आणि ७० किलो पुढील अशा विविध वजनी गटात प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ५ विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, ‘नवी मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशन'चे अध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच शरीरसौष्ठव क्षेत्रातील मान्यवर ‘महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन'चे सचिव राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष गोपाळ गायकवाड, पदाधिकारी शरद मारणे तसेच ‘नवी मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशन'चे सचिव हेमंत खेबडे आणि या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.