नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी
वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्वांची सामुहिक जबाबदारी -ना. प्रताप सरनाईक
ठाणे : वाहन चालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. परदेशात अपघाताचे प्रमाण का कमी आहे? याचा आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. परदेशात ठिकठिकाणी रिपलेक्टर्स लावले जातात. जागोजागी सूचना फलक लावले जातात. जेणेकरुन वाहन चालवित असताना वाहनचालकांना नेमके कुठे जायचे, याचा बोध होतो. या विभागाकडून वाहतुकीच्या निकषात अधिक सुधारणा केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. वाहतुकीची शिस्त पाळणे सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे केले.
प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम होत असतो. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे मोटार वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर परिवहन आयुक्त (मुंबई) भरत कळसकर, जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार, सहायक आयुक्त शैलेश कामत, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ‘ठाणे जिल्हा दैनिक पत्रकार संघ'चे अध्यक्ष आनंद कांबळे, नितीन डोसा, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, आदि उपस्थित होते.
अपघात आणि मृत्यू प्रमाण कमी किंवा शून्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. यापुढे पार्किंग व्यवस्था नसेल तर नवीन वाहन नोंदणी केली जाणार नाही. यासाठी महापालिकेकडून भाडेतत्वावर नवीन वाहन पार्किंगसाठी मंजुरी मिळाली तर वाहन नोंदणी करणे शक्य होईल. यासाठी निकष आणि नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागानेही वाहन चालकांकडून नियमांचे उल्लघंन होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे ना. सरनाईक म्हणाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते २ माहिती पुस्तिकांचेही प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रम तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती दिली.
आभार प्रदर्शन करताना अप्पर परिवहन आयुक्त मुंबई भरत कळसकर यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा महत्वाची आहे. ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या वाढली आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. गाडी चालविताना मोबाईल बंद ठेवावा, सीट बेल्टचा वापर करावा. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर अवश्य करावा, असे ते म्हणाले.