छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
खारघर मध्ये अनेक मतदारांच्या नावावर डिलीट शिक्का
खारघर : खारघर मधील बहुतांश मतदार यादीतील मतदारांची नावे डिलीट केल्यामुळे अनेकांना मतदान करता आले नाही तर अनेकांची नावे मतदारयादीत नव्हती. मतदानाला आलेल्या अनेक मतदारांना माघारी फिरावे लागल्यामुळे निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत खारघर मध्ये ९८ हजाराहून अधिक मतदार होते. शहराच्या वाढत्या विकासामुळे लोकसंख्येत भर पडल्याने मतदार संख्या सव्वा लाखाहून अधिक झालेली आहे. गेल्या ५ वर्षात अनेकांनी नवीन मतदार म्हणून नाव-नोंदणी केली होती. तसेच बहुतांश मतदारांची नावे देखील मतदार यादीत समावेश असताना त्यांच्या नावावर डिलीटचा शिक्का असल्यामुळे नाव असुनही त्यांना माघारी फिरावे लागले. विशेष म्हणजे काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र देखील होते.
पनवेल महापालिका आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करुनही लोकसभा निवडणुकीत अनेकांनी मतदानाचा हक्क देखील बजवला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावे डिलीट केल्याचे तर मतदार यादीत नाव नसल्यामुळे अनेकांना मतदान न करताच माघारी फिरावे लागले. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचे चित्र खारघर मध्ये दिसून आले.
‘निवडणूक आयोग'ने मतदार यादी आणि सेक्टर निहाय ‘बीएलओ'ची नेमणूक केली आहे. बीएलओ कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदारांचा शोध घेवून मतदान स्लिप देणे आवश्यक आहे. मात्र, खारघर मधील मतदार याद्यांमध्ये मतदारांचा पत्ता चुकीचा नोंद नमूद असल्यामुळे मतदारांचा शोध घेणे अवघड असल्याने, ‘बीएलओ'ने चुकीची माहिती दिल्यामुळे नावे डिलीट केली असावे, असे काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी मतदान केले होते. आज गोखले शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता नावावर डिलीटचा शिक्का असल्यामुळे मतदान करता आले नाही. मतदान केंद्रावरुन माघारी फिरावे लागले. -अंजना नोवाल, शिक्षिका, खारघर.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आलेल्या अनेक मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का मारण्यात आल्याचे दिसले. तसेच काहींची नावे नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. -संतोष पंडीत, सामाजिक कार्यकर्ता.
माजी ग्रामपंचायत सदस्याचे मतदार यादीतून नाव गायब...
आजपर्यंत अनेक वेळा मतदान केले. एव्हढेच नव्हेतर ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीत उमेदवार होतेे. मतदार ओळखपत्र असतानाही मतदार यादीतून नाव गायब झाल्यामुळे मतदान करता आले नाही. - सीमा रमेश खडकर, माजी ग्रामपंचायत पंचायत सदस्य.